शेवगावात पावसाचा हाहाकार : जनावरे, वाहने गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:03+5:302021-09-02T04:46:03+5:30

शेवगाव : सोमवारी रात्री तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नद्यांचे पाणी काही गावांमध्ये घुसून घरांचे नुकसान झाले. अनेकांना ...

Heavy rains in Shevgaon: Animals, vehicles carried away | शेवगावात पावसाचा हाहाकार : जनावरे, वाहने गेली वाहून

शेवगावात पावसाचा हाहाकार : जनावरे, वाहने गेली वाहून

शेवगाव : सोमवारी रात्री तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नद्यांचे पाणी काही गावांमध्ये घुसून घरांचे नुकसान झाले. अनेकांना रात्र जागून काढावी लागली. आखेगाव परिसरात जनावरे, वाहने वाहून गेली आहेत. तर नानी नदीच्या पलीकडे जवळपास १०० नागरिक अडकले असून त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील शेवगाव महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली असून २४ तासांत ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अन्य महसूल मंडळात पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील बहुतांश नद्यांना आलेल्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आखेगाव, भगूर, वडुले गावात पुराचे पाणी शिरले आहे. तेथील काही नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे. पुराच्या पाण्यात काहींची जनावरे, वाहने वाहून गेल्याचे सांगण्यात येते. जोरदार पावसामुळे शेळ्या, मेंढ्या मृत पावल्या आहेत. तालुका प्रशासनाच्या वतीने येत्या चोवीस तासात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने वतीने देण्यात आल्या आहेत.

आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके हे पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भेटी दरम्यान नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

.............

फोटो ओळी : शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील नाणी नदीला आलेल्या पुराने धोक्याची पातळी ओलांडून पुराचे पाणी गावात शिरले.

Web Title: Heavy rains in Shevgaon: Animals, vehicles carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.