सातेफळ तापाने फणफणले
By Admin | Updated: October 5, 2014 23:57 IST2014-10-05T23:51:16+5:302014-10-05T23:57:27+5:30
खर्डा : विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असताना सातेफळ गावात अचानक आलेल्या तापाने थैमान घातले आहे़

सातेफळ तापाने फणफणले
खर्डा : विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असताना सातेफळ गावात अचानक आलेल्या तापाने थैमान घातले आहे़ अचानक ताप येणे, चक्कर येणे, अशक्तपणा, अंगदुखी, लालसर पुरळ येणे आदी आजारांमुळे गावात अनारोग्य पसरले आहे़ अनेक रुग्णांमध्ये चिकुणगुणियाची लक्षणे दिसत असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ निवडणुकीच्या धामधुमीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे गावकरी सांगतात़
खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोनेगाव उपकेंद्रांतर्गत सातेफळ गाव आहे़ सोनेगाव उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे़ त्यामुळे परिसरातील रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे़ खर्डा आरोग्य केंद्रांतर्गत ३२ गावांसह वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे़ या आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी आहेत़ सोनेगाव उपकेंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे या उपकेंद्राचा अतिरिक्त ताण वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे़ त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही़ अचानक ताप येणे, सांधेदुखी, थंडी वाजून येणे, चक्कर येणे, अशक्तपणो, अंगदुखी, लालसर पुरळ येणे, डोकेदुखी आदी आजार बळावले आहेत. (प्रतिनिधी)