निपाणीवडगावच्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
By Admin | Updated: June 30, 2014 00:33 IST2014-06-29T23:18:34+5:302014-06-30T00:33:37+5:30
अहमदनगर: दिंडीतच वारकऱ्याला मरण आले आणि ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती देऊन एका वारकऱ्याने दिंडीतच
निपाणीवडगावच्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
अहमदनगर: दिंडीतच वारकऱ्याला मरण आले आणि ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती देऊन एका वारकऱ्याने दिंडीतच अखेरचा विश्राम घेतला. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील त्रिंबक तुकाराम थोरात (वय ५५) या वारकऱ्याचा रविवारी दुपारी दिंडीतील विश्रांतीच्या वेळी हृदयविकाराने मृत्यू झाला.
आधीच एकदा हृदयविकाराचा झटका आलेला असतानाही विठ्ठल भेटीची आस मनात ठेवून वारीला निघालेल्या या वारकऱ्यावर काळाने झडप घातली. वारकरी विठ्ठल चरणी लीन झाल्याची भावना ठेवून वारकऱ्यांनीही हरिनामाच्या गजरात भक्ताला जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला. श्रीरामपूर तालुक्याकील निपाणी वडगाव येथील दिंडी पंढरपूरला जाते. वीरभद्र पायी दिंडी सोहळा असे या दिंडीचे नाव आहे. सुदाम महाराज चौधरी हे दिंडीचे चालक आहेत. दिंडीचे यंदा सहावे वर्ष आहे. दिंडीमध्ये दोनशे वारकरी सहभागी झाले होते. त्रिंबक थोरात यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ते ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांचा एक मुलगा टेलरिंग काम करून त्यांना हातभार लावायचा. थोरात यांना याआधी एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. मुलाने दिंडीत जाऊ नका, असेही सांगितले होते. मात्र विठ्ठलाच्या भेटीची आस मनात ठेवून दिंडीत जाणारच असा त्यांनी मनाशी निर्धार केला होता. पण काळाला वेगळेच अपेक्षित होते. दिंडी नगर तालुक्यातील वाळूंज येथे आली. दुपारी भोजन झाल्यानंतर वारकरी विश्रांती घेत होते. यावेळी थोरात यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडिलांची तब्येत ठीक आहे की नाही, हे पाहण्यासाठी थोरात यांच्या मुलाने दिंडीमध्ये एक-दोन वेळा भेट देऊन विचारपूस केली होती. विठ्ठलाच्या भेटीची आस असलेल्या थोरात यांची विठ्ठल भेटीची आस मात्र अधुरीच राहिली. जीवनाची वारी अर्ध्यावरच सोडून त्यांनी अखेरचा ‘राम राम’ घेतला.(तालुका प्रतिनिधी)