जायकवाडीच्या पाण्याबाबत प्राधिकरणाची सुनावणी
By Admin | Updated: November 6, 2014 14:39 IST2014-11-06T14:39:10+5:302014-11-06T14:39:10+5:30
मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

जायकवाडीच्या पाण्याबाबत प्राधिकरणाची सुनावणी
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.
गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांनी गोदावरी खोर्यातील पाण्याचे समन्यायी वाटप होण्याबाबत प्राधिकरणात याचिका दाखल केली आहे. श्रीरामपूरचा अशोक सहकारी साखर कारखान्यासह कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना, श्रीरामपूरचे भाऊसाहेब दौंड, दशरथ पिसे या शेतकर्यांसह एकूण १७ जण याचिकादार, सहयाचिकादार आहेत.
१९ सप्टेंबरला प्राधिकरणाने औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात संबंधित मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांच्यासोबत जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. तसेच महामंडळाने १४ ऑक्टोबरला राज्य सरकारकडे काही मुद्यांबाबत स्पष्टीकरण मागविले होते. त्यावर राज्य सरकारने स्वत:चे मत न देता उलटपक्षी महामंडळास
प्राधिकरणाकडूनच स्पष्ट आदेश मिळविण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार महामंडळाने प्राधिकरणास २७ ऑक्टोबरला याबाबत योग्य ते स्पष्टीकरण करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने येत्या ११ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता याबाबत सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे अहमदनगर जिलतील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांसह, साखर कारखाने व इतर पदाधिकार्यांचे लक्ष लागले आहे.