मार्गदर्शन नसल्याने आरोग्य यंत्रणा संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:24+5:302021-03-01T04:24:24+5:30
अहमदनगर : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास आजपासून सुरुवात होत आहे. नगर जिल्ह्यात मात्र ही ...

मार्गदर्शन नसल्याने आरोग्य यंत्रणा संभ्रमात
अहमदनगर : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास आजपासून सुरुवात होत आहे. नगर जिल्ह्यात मात्र ही लस कधी द्यायची, कोणाला द्यायची, याबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळाले नसल्याने आरोग्य यंत्रणेतील अधिकारीच संभ्रमात आहेत. लसीकरण सुरू झाले म्हणजे नेमके काय करायचे, याबाबत यंत्रणाच चाचपडली. दरम्यान, १ मार्चपासून पोर्टलवर नोंदणी सुरू होणार असून, अहमदनगर जिल्ह्यात ३५ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयामधूनही आता लस घेऊ शकणार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना २५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. सरकारी रुग्णालयामधून मात्र ही लस मोफत असणार आहे. एक मार्च म्हणजे आजपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ज्यांना विविध आजार आहेत, अशा ४५ वर्षांवरील नागरिकांना ही लस देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य यंत्रणेने स्थानिक प्रशासनाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माहिती दिली आहे. मात्र, ही लस कुठे देणार, कशी देणार, आधी कोणाला देणार, त्यासाठीची नेमकी काय प्रक्रिया काय आहे, याचे कोणतेही मार्गदर्शन स्थानिक प्रशासनाला मिळालेले नाही. त्यामुळे नेमके काय नियोजन करायचे, याबाबत अधिकारी संभ्रमात आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांचा लसीकरणासाठी सहभाग वाढविला आहे. जिल्ह्यातील ३५ खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळणार आहे. त्याची यादी केंद्र सरकारने रविवारी जाहीर केली.
-------
कुठे मिळणार ही लस
महापालिका, नगरपालिकांची रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध असणार आहे, तर जिल्ह्यातील ३५ खासगी रुग्णालयांमध्ये ही लस २५० रुपयांना मिळणार आहे. याच केंद्रावर लसीकरणासाठी नोंदणीही करता येणार आहे. याशिवाय को-विन ॲप, आरोग्य सेतू ॲपवरही नोंदणीची सोय असणार आहे.
----------
लसीकरणासाठी काय लागणार
ही लस घेण्यापूर्वी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील, तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांचे प्रमाणपत्रही आवश्यक राहणार आहे.
-
सोबत यादी
या खासगी रुग्णालयात मिळणार लस-