'चोरून लसीकरण' प्रकरणाची आरोग्य विभागाकडून होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:01+5:302021-05-15T04:19:01+5:30
आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चोरून लसीकरणाबाबत सोनई येथील अनिल निमसे यांनी गुरुवारी सोनई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार ...

'चोरून लसीकरण' प्रकरणाची आरोग्य विभागाकडून होणार चौकशी
आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चोरून लसीकरणाबाबत सोनई येथील अनिल निमसे यांनी गुरुवारी सोनई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. हा विषय आरोग्य विभागाशी निगडित असल्याने तसेच या प्रकरणाच्या योग्य त्या चौकशीसाठी सोनई पोलिसांनी ही तक्रार तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. निमसे हे चार दिवसांपासून त्यांच्या आईला कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात होते. मात्र लस संपल्याचे सांगितले जात होते. गुरुवारी (दि.१३) दुपारी एक वाजता निमसे हे पुन्हा केंद्रात गेले तेव्हाही लस नसल्याचे सांगितले. यावेळी एका अज्ञात व्यक्तीचा आरोग्य केंद्रातील डॉ. पंढरीनाथ कसबे यांना फोन आला. यावेळी कसबे यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचारी जावळे यांना बोलावून घेतले. त्यानंतर जावळे हे एक बॉक्स दुचाकीला लावून नगरच्या दिशेने निघाले. यावेळी निमसे व संदीप कुसळकर यांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. जावळे हे शनिशिंगणापूर येथील भोजनालयात आले. तेथे जावळे यांनी सिरिंज भरून एका महिला कर्मचाऱ्यांकडे दिली. या महिलेने ही सिरिंज डॉ. वाघ यांच्याकडे दिली. वाघ यांनी ही लस तेथे कारमध्ये थांबलेल्या एका महिलेला दिली. असे निमसे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या सर्व घटनाक्रमाचे 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशन करत चित्रीकरण केले आहे. आता या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
.......
कोविड लसीकरण संदर्भात अनिल निमसे यांनी दिलेली तक्रार चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व बीडीओ यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून फिर्याद दाखल झाली तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल.
-रामचंद्र करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोनई पोलीस स्टेशन
.........
सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाबाबत पोलिसांकडून आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे. यासंदर्भात तहसीलदार यांच्याशी चर्चा करून याप्रकरणी पुढे योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल.
-अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी, नेवासा
........