आरोग्य यंत्रणेचे प्रमुख पोखरणा, बोरगे वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:54+5:302021-06-04T04:16:54+5:30
अहमदनर : कोरोना आटोक्यात आणण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिकारीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील ...

आरोग्य यंत्रणेचे प्रमुख पोखरणा, बोरगे वादाच्या भोवऱ्यात
अहमदनर : कोरोना आटोक्यात आणण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिकारीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव थेट आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना कारवाईची नोटीस बजावली गेली आहे. आरोग्य विभागाच्या दोन्ही प्रमुखांवर आरोग्य विभाग कारवाई करणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. अशावेळी आरोग्य यंत्रणेकडून सामान्यांना अपेक्षा असते. परंतु, ही यंत्रणा चालविणारे प्रमुख अधिकारीच कसे बेफिकीर आहेत, हे दोन वेगवेगळ्या घटनांतून समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ही बैठक आरोग्य विभागाशी संबंधित होती. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांची भूमिका महत्त्वाची होती. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सक या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे पंतप्रधानांसमोर सादरीकरण करताना जिल्हाधिकारी भोसले यांना अडथळे आले. अशा बेफिकीर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी कणखर भूमिका भोसले यांनी घेतली. तसा प्रस्तावही त्यांनी आरोग्य विभागाला पाठविला. हे प्रकरण गाजत असतानाच दुसरे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त दालनातील खुर्चीत बसून गाणे म्हणत असल्याचा बोरगे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल घेऊन आयुक्त शंकर गोरे यांनी बोरगे यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा अशायाची नोटिस धाडली. परंतु, पुढे काय झाले हे ते आयुक्त गोरे व बोरगे यांनाच माहीत. ही घटना ताजी असतानाच मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यानेही नियम पायदळी तुडवित आरोग्य केंद्रात केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आरोग्य विभाग चांगलाच चर्चेत आला. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य जितके सामान्य नागरिकाला आहे, त्यापेक्षाही अधिक आरोग्य यंत्रणेला आहे. परंतु, अशा काळात हे अधिकारी इतक्या बेफिकिरीने कसे वागू शकतात, त्यांना कुणाचे पाठबळ आहे, यासह एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
....
मंत्री, खासदार आमदारांचीही चुप्पी
कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि अपुरे मनुष्यबळ, यामुळे आधीच आरोग्य यंत्रणा हतबल आहे. अशाही परिस्थितीत आरोग्याचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु,यंत्रणेचे प्रमुख अधिकारी वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडलेले असताना जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार याबाबत एक चकार शब्द बोलताना दिसले नाहीत. लोकप्रतिनिधी अशा बेफिकीर अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
....
आरोग्यमंत्री आले आणि गेले
आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या शनिवारी नगर शहरातून गेले. ते काहीवेळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. आरोग्यमंत्री टोपे यांच्या धावत्या दौऱ्यात हा विषय चर्चिला गेला नाही. त्यामुळे थेट कारवाईबाबत कोणताही निर्णय झाला नाही.