मराठा आंदाेलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत अनवाणी चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:10+5:302021-08-13T04:25:10+5:30
कर्जत : मराठा आरक्षणाबाबतच्या विविध आंदोलनांमध्ये राज्यातील अनेक युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत ...

मराठा आंदाेलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत अनवाणी चालणार
कर्जत : मराठा आरक्षणाबाबतच्या विविध आंदोलनांमध्ये राज्यातील अनेक युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत अनवाणी चालण्याचा प्रण कर्जत शहरातील युवक नितीन तोरडमल याने केला आहे.
राज्यात सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध प्रकारची आंदोलने मागील चार-पाच वर्षांत झाली. यावेळी मराठा समाजाची अनेक शाळकरी मुले, युवक आणि कार्यकर्त्यांवर सरकारने मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केलेले आहेत. ते सर्व गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल असल्याने त्यांना शिक्षण, नोकरी व व्यवसाय यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे.
सरकारने अनेकवेळा मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची केवळ घोषणाच केली; परंतु त्यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यभर अनेक गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही सरकार ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक आंदोलनांमध्ये सर्वांबरोबर सक्रिय सहभागी असणारा मराठा समाजातील युवक नितीन तोरडमल याने सोमवारी (दि.९) ऑगस्ट क्रांती दिनापासून सरकार न्यायालयातील सर्व गुन्हे प्रत्यक्षपणे मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ॲड. धनराज राणे, मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
----
१२ नितीन तोरडमल