तिरंग्यासह आठ तासांत धावला ७२ किमी अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST2021-02-05T06:27:54+5:302021-02-05T06:27:54+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेरच्या सौरभ जाधवने प्रजासत्ताकदिनी हातात तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ७२ किलोमीटर अंतर ...

He ran 72 km in eight hours with the tricolor | तिरंग्यासह आठ तासांत धावला ७२ किमी अंतर

तिरंग्यासह आठ तासांत धावला ७२ किमी अंतर

अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेरच्या सौरभ जाधवने प्रजासत्ताकदिनी हातात तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ७२ किलोमीटर अंतर कमी वेळेत धावण्याचा विक्रम नोंदवला आहे.

इंडियन फ्लॅग रनर्स या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. हे अंतर कापण्यासाठी धावपटूंना १४ तासांची कमाल मर्यादा देण्यात आली होती. २६ जानेवारी रोजी पहाटे साडेसहा वाजता हडपसर पोलीस चौकीपासून त्याने धावण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय धावपटू उषा पाटील यांनी सौरभला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्याने धावण्यास सुरुवात केली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर-यवत गाव ते पुन्हा हडपसर पोलीस चौकी अशा मार्गाने तो धावला. त्याने ७२ किलोमीटरचे अंतर केवळ ८ तास ४४ मिनिटांमध्ये पार केले. मूळ ठिकाणी पोचल्यानंतर तेथील स्थानिक नगरसेवक आबासाहेब तुपे, हडपसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र अडागळे व नागरिकांनी त्याचा सत्कार केला. त्याच्या या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाणार असल्याने अकोळनेरचे नाव त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. भारतातून ६३ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

सौरभ जाधव हा मूळचा अकोळनेर (ता. नगर) येथील असून त्याचे वडील पोपट जाधव व कुटुंबीय कामानिमित्त हडपसर (पुणे) येथे स्थायिक झाले आहेत. आंतरराष्ट्रीय धावपटू महेंद्र बाजारे, संदीप टेळेकर, निलेश मिसाळ, अमृता पंडित, शेरबहाद्दूर, विकी बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ धावण्याचा सराव करतो आहे.

स्पर्धेचे आयोजन सुदर्शन सिंग व तेजेंद्र सिंग यांनी केले होते. त्याच्या सोबत साताऱ्याची धावपटू प्रणाली जाधव, कुटुंबीय हनुमंत जाधव, उमेश जाधव, गौरव जाधव, बाळासाहेब काफे, हर्षवर्धन जाधव आदी होते. भारतीय सैन्यात भरती होऊन भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या या यशाबद्दल अकोळनेरचे माजी सरपंच अरुण जाधव, प्रगतशील शेतकरी सुखदेव जाधव, पुणे माथाडी कामगार संघटनेचे साहेबराव जाधव तसेच शिक्षक नेते संजय शेळके आदींनी अभिनंदन केले आहे.

-------

रात्रपाळीत काम, दिवसा सराव

मगरपट्टा भागातील कंपनीत रात्रपाळी काम व दिवसा कॉलेज आणि धावणे अशा प्रतिकूल परिस्थितीत तो आपला छंद जोपासत आहे. आजवर १२ किमी, ३२ किमी, हाफ मॅरेथॉन, गणेगाव मॅरेथॉन, २१ किमी, पुणेकर हाफ मॅरेथॉन, ५ किमी आदी स्पर्धांमधून तो धावला आहे. अनेक बक्षिसे त्याच्या नावावर आहेत. आई सीता यादेखील मोलमजुरी करून आपल्या मुलाचे धावपटू होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडत आहेत.

-------------क्रीडा प्रेमीकडून मदतीचा अपेक्षा

सौरभला धावण्याचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोटिनयुक्त आहार, धावण्यासाठीचे बूट, ट्रॅक सूट आदींचा खर्च भागवणे अशक्य होत आहे. मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांचे मानधन देणे त्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. तसेच राज्यात व राज्याबाहेर होणाऱ्या राज्य-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यात त्याला आर्थिक चणचण भासते. त्यामुळे क्रीडाप्रेमी किंवा दानशुरांकडून त्याला मदतीची अपेक्षा आहे.

-------

फोटो - २८सौरभ जाधव

मूळचा अकोळनेर येथील सौरभ जाधव याने पुणे येथे तिरंगा झेंडा हाती घेऊन ७२ किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करून कमी वेळेत धावण्याचा विक्रम केला.

Web Title: He ran 72 km in eight hours with the tricolor