‘तो’ मृत्यू गोळीबारातून नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:41+5:302021-07-14T04:24:41+5:30
श्रीगोंदा : पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील पांडुरंग जयवंत पवार (वय ५२) यांचा मृत्यू गोळीबाराने झालेला नाही. डोक्याला मार लागल्याने ...

‘तो’ मृत्यू गोळीबारातून नाही
श्रीगोंदा : पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील पांडुरंग जयवंत पवार (वय ५२) यांचा मृत्यू गोळीबाराने झालेला नाही. डोक्याला मार लागल्याने अथवा मार देऊन हा मृत्यू झालेला आहे, असे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पांडुरंग पवार यांचा मृतदेह श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शिवारात आढळून आला होता. हा मृत्यू गोळीबारात झाला असावा, अशी शंका व्यक्त केली होती.
या प्रकरणी शंकर जयवंत पवार, दत्तात्रय भाऊसाहेब लंटाबळे, शिवदास श्रीरंग रासकर, शंकर काशीनाथ जवटे (रा. पिंपळनेर, ता. पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवदास रासकर, दत्तात्रय लटांबळे, शंकर जवटे या तिघांना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली. मात्र मयताचा भाऊ शंकर पवार हा फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय आला होता.
पोलिसांनी गोळीबाराची शंका विचारात घेऊन पांडुरंग पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठविला. त्याचा वैद्यकीय अहवाल सोमवारी उशिरा पोलिसांच्या हाती आला आहे.
आता पांडुरंग पवार यांचा मृत्यू अपघाती झाला की डोक्याला मार देऊन खून करण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. शंकर पवार याला अटक केल्यानंतर या घटनेतील सत्य बाहेर येऊ शकेल.