अण्णा हजारे यांना धमकी देणाऱ्याला अटक
By Admin | Updated: June 4, 2016 23:58 IST2016-06-04T23:50:28+5:302016-06-04T23:58:59+5:30
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणाऱ्या नेवासा येथील एका लॉजचा मालक ज्ञानेश मोहिनीराज पानसरे (वय ४३, रा. नेवासा) याला पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

अण्णा हजारे यांना धमकी देणाऱ्याला अटक
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणाऱ्या नेवासा येथील एका लॉजचा मालक ज्ञानेश मोहिनीराज पानसरे (वय ४३, रा. नेवासा) याला पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. लष्करे टोळीतील लोक त्रास देत असल्याने त्यांना पोलिसांचा त्रास व्हावा, या हेतुने त्यांच्या नावाने अण्णा हजारे यांना धमकी दिल्याची कबुली पानसरे याने दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकारांना दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वर्षभरात अनेकवेळा जीवे मारण्याच्या वारंवार धमक्या येत होत्या. सहा धमकी पत्रे ही नेवासा येथील टपालाने आलेली होती. सर्व धमकीपत्रे ही एकाच व्यक्तीने लिहिलेली आणि एकाच हस्ताक्षरात होती. या धमकी पत्रांमध्ये नेवासा येथील अण्णा लष्करे गँगचे अंबादास चिमाजी लष्करे, पप्पू पवार, पिटेकर यांचे व त्यांच्या साथीदाराची नावे असल्याने सुरवातीला नेवासा भागात तपास केला. लष्करे टोळीशी संबंधित लोकांचीही चौकशी केली. त्यांच्याकडे तसेच त्यांच्या विरोधकांकडेही चौकशी केली. दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बल्लाळ यांनाही एक धमकी आली होती. तपासामध्ये नेवासा येथील समाधान लॉजचे मालक ज्ञानेश मोहनीराज पानसरे याच्याबाबत संशय बळावला. त्याच्या हालचालीवर नजर ठेवली. त्याची हस्ताक्षरे गोपनीयरित्या मिळवून खात्री केली. अंबादास चिमाजी लष्करे व त्याचे साथीदार लॉजसमोरील कठड्यावर बसून टिंगळ टवाळी करायचे. अवेळी बाथरुमसाठी लॉजमध्ये घुसायचे. त्याचा त्रास सहन न झाल्याने व त्यांना पोलिसांकडून त्रास व्हावा, या उद्देशाने लष्करे याच्या नावाने अण्णा हजारे यांना धमकीची पत्रे तयार करून पाठविली, अशी कबुली पानसरे याने दिली आहे.
मला अनेकवेळा धमक्या आल्या, मात्र त्याला मी घाबरलो नाही. मला वारंवार धमक्या देणारा आरोपी पोलिसांनी पकडला, याचा आनंद वाटतो. त्यासाठी पोलिसांनी मेहनत घेतली. मला धमकी देणाऱ्याला ज्या गंभीरपणे पोलिसांनी कारवाई करून अटक केली, त्याच गंभीरपणे डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांची हत्या करणारे आरोपी पकडले जावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. धमकी देणारा आरोपी सापडला आहे. आता सरकारने माझे संरक्षण कमी करावे. संरक्षणासाठी फार मोठी यंत्रणा वापरली जाते, हे बरे वाटत नाही. -अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक