लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १८ डिसेंबर रोजी होणारा अल्पसंख्याक हक्क दिन रद्द करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याकांच्या प्रश्नासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
१८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, चालूवर्षी हा दिवस साजरा करण्यात आला नाही. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने अल्पसंख्याक दिन साजरा करता येणार नाही, असे कळविले. तसे पत्र सामान्य प्रशासनाकडून अल्पसंख्याक प्रतिनिधींना पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर उबेद शेख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय हक्क दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना राष्ट्रीय हक्क दिन साजरा कसा केला गेला, असा सवाल शेख यांनी निवेदनात उपस्थित केला आहे. अल्पसंख्याक दिवस साजरा न झाल्याने जिल्ह्यातील अल्पसंख्याकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणीही शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.