बायकोकडून त्रास, पतींची भरोसा सेलमध्ये धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:39+5:302021-07-26T04:20:39+5:30
अहमदनगर : घरात पतीकडून मारहाण, मानसिक छळ अशा स्वरूपाच्या तक्रारी नेहमीच समोर येतात. आता मात्र पत्नीकडूनच घरात छळ होत ...

बायकोकडून त्रास, पतींची भरोसा सेलमध्ये धाव
अहमदनगर : घरात पतीकडून मारहाण, मानसिक छळ अशा स्वरूपाच्या तक्रारी नेहमीच समोर येतात. आता मात्र पत्नीकडूनच घरात छळ होत असल्याच्या तक्रारीही पुरुष मंडळी करू लागली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये जानेवारी ते मेदरम्यान ११४ पुरुषांनी पत्नीविरोधात तक्रार करत मदत मागितली आहे.
कोरोनाकाळात भरोसा सेलकडे महिलांसह पुरुषांच्याही तक्रार वाढल्या आहेत. जानेवारी ते मेदरम्यान ८१४ महिलांनी सासरी पती व इतर नातेवाइकांकडून छळ होत असल्याची तक्रार केली, तर ११४ पुरुषांनी पत्नीविरोधात तक्रार केली आहे. यापैकी ५७ तक्रारींचा भरोसा सेलने निपटारा केला आहे. शहरासह ग्रामीण भागातूनही तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. कोरोनाकाळात नोकरी, व्यवसाय ठप्प झाल्याने बहुतांशी जणांना घरात बसण्याची वेळ आली. सहवास वाढला तशी भांडणेही वाढली. विशेष म्हणजे काही तक्रारींमध्ये तर भांडणाचे अगदी शुल्लक कारने नमूद आहेत.
---
आर्थिक टंचाई आणि अतिसहवास
कोरोनामुळे नोकरी, व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने बहुतांशी घरात आर्थिक कारणांतून वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे पती-पत्नी जास्त काळ सहवासात राहिल्याने शुल्लक कारणातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत, असेही भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींवरून दिसून येते.
-------------------------
अशा आहेत पतींच्या तक्रारी
माझे सासू-सासरे पत्नीचे कान भरवितात अन् ती ते सांगेल तसेच वागते.
सतत माहेरी जाण्याचा हट्ट असतो.
आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा धरते हट्ट.
पत्नी जॉब करते. त्यामुळे मला व मुलांना वेळ देत नाही. मुलांनाही मलाच सांभाळावे लागते.
पत्नी मला समजून घेत नाही. पत्नी तिच्या जुन्या मित्रांच्या सतत संपर्कात राहते.
पत्नीच्या शॉपिंगमुळे मी कंगाल झालोय.
-------------------------------
४५० जणांचा पुन्हा सुखाचा संसार
भरोसा सेलकडे २०१९ ते २०२० या वर्षांत ३७३ पुरुषांनी तक्रारी केल्या होत्या. सेलमधील समुपदेशकांनी तक्रारदारासह त्याची पत्नी व इतर नातेवाइकांना कार्यालयात बोलावून त्यांचे समुपदेशन करत त्यांचा संसार पुन्हा सुरळीत केला. तर चालू वर्षात पुरुषांच्या दाखल ११४ तक्रारींपैकी ५७ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. अडीच वर्षांत ४५० तक्रारदार पुरुषांचा संसार भरोसा सेलच्या माध्यमातून नव्याने सुरळीत झाला.
------------------------