हस्त नक्षत्राचा तडाखा कायम
By Admin | Updated: October 4, 2016 00:46 IST2016-10-04T00:21:20+5:302016-10-04T00:46:17+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात हस्त नक्षात्रातील पावसाचा तडाखा कायम आहे. सोमवारी तिसऱ्या माळीच्या दिवशी नगरशहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले

हस्त नक्षत्राचा तडाखा कायम
अहमदनगर : जिल्ह्यात हस्त नक्षात्रातील पावसाचा तडाखा कायम आहे. सोमवारी तिसऱ्या माळीच्या दिवशी नगरशहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक तालुक्यात नदी, नाले, गाव तलाव, बंधारे तुडूंब झाले असून अनेक ठिकाणी पाणी ओव्हरफोलो झाले आहे. सोमवारी सायंकाळी मेहेकरी नदीला पूर आल्याने नगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली झाली होती. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात ४७ टक्क्यांच्या सरासरीने ६६० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३० मि.मी. पाऊस श्रीरामपुरात झाला आहे.
जिल्ह्यात हस्त नक्षत्रातील पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. सलग पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने धरणे, तलाव, बंधारे तुडंूब झाले आहे. विशेष करून दक्षिण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासह राहुरी, नेवासा, शेवगाव, श्रीरामपुर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने विविध नद्यातून जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाणी झेपावत आहे. आणखीन काही दिवस असाच पाऊस झाल्यास ओला दुष्काळाची चिन्हे आहेत.
रविवारी अकोले, संगमनेर वगळता सर्वच तालुक्यात दमदार पावसाच्या नोंदी आहेत. श्रीरामपुर आणि बेलापूर महसूल मंडळात १०० मि.मी. पेक्षा अधिक तर १९ महसूल मंडलात ५० मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयाच्या एकूण पावसाच्या सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
सोमवारी पुन्हा राहुरी, वांबोरी, कोल्हार, जामखेड, राहाता या भागात मुसधार पाऊस झालेला आहे. यासह शहरातही दिवसभर अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
(प्रतिनिधी)