अर्धा नगर तालुका झाला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:14+5:302021-06-09T04:26:14+5:30
केडगाव : अर्धा नगर तालुका आता कोरोनामुक्त झाला असून, ४३ गावांची सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. आणखी ४२ गावेही ...

अर्धा नगर तालुका झाला कोरोनामुक्त
केडगाव : अर्धा नगर तालुका आता कोरोनामुक्त झाला असून, ४३ गावांची सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. आणखी ४२ गावेही कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घसरण होत असून, आतापर्यंत १४ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर वळणावर पोहोचली होती. जवळपास ४०२ रुग्णांना यात जीव गमवावा लागला. गावेच्या गावे महिनाभर बंद ठेवावी लागली होती. आता मात्र तालुक्यात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असून, कोरोना संसर्गाची स्थिती आता नियंत्रणात येत आहे. तालुक्यात आतापर्यंत १५ हजार ११५ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील १४ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण होत असून, तालुक्यात आता फक्त २६४ रुग्ण उरले आहेत. जवळपास निम्म्या तालुक्यातील म्हणजे ४३ गावांची सक्रिय रुग्णसंख्या आता शून्यावर आली आहे, तसेच आणखी २२ गावे लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.
तालुक्यातील भातोडी, वडगाव गुप्ता, नवनागापूर या तीन गावांमध्येच सक्रिय रुग्णांची संख्या दोन अंकी उरली आहे. उर्वरित गावे कोरोनाच्या संकटातून हळूहळू बाहेर पडत आहेत. तालुक्यात सर्वात कमी रुग्णसंख्या आता वाळकी आरोग्य केंद्रात असून, देहरे व टाकळी खातगाव आरोग्य केंद्रात रुग्णसंख्या काहीसी अनियंत्रित आहे; मात्र या दोन्ही केंद्रातील बहुतेक गावातून कोरोना हद्दपार झाला आहे.
---
कोरोनामुक्त गावे..
सोनेवाडी, बाराबाभळी, शहापूर, पारगाव, देवगाव, रतडगाव, रांजणी, कौडगाव, बाळेवाडी, जांब, इमामपूर, पोखर्डी, खोसपुरी, आव्हाडवाडी, उदरमल, पांगरमल, भोयरे पठार, सारोळा कासार, घोसपुरी, निंबोडी, सांडवे, दशमीगव्हाण, उक्कडगाव, नारायणडोहो, बाबुर्डी घुमट, बुरूडगाव, देऊळगाव, गुणवडी, खडकी, खंडाळा, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद, पिंप्री घुमट, कोळपे आखाडा, हातवळण, दहीगाव, पारगावमौला, वाकोडी, निमगाव घाणा, हिंगणगाव, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, निमगाव वाघा.
---
आरोग्य केंद्रनिहाय सक्रिय रुग्णसंख्या
मेहेकरी-२८, देवगाव- २०, जेऊर-३३, चास-२१, टाकळी काझी- ३१, वाळकी- ११, देहेरे-५१, रूईछत्तीसी-२३, टाकळी खातगाव-४६.
---
कोरोना मुक्तीसाठी या गोष्टी ठरल्या फायदेशीर
गाव तेथे लसीकरण मोहीम, गाव निहाय विलगीकरणाची प्रभावी अंमलबजावणी, तालुका महसूल प्रशासनाची ठोस कार्यवाही, तालुका आरोग्य विभागाची तत्पर सेवा, गावोगावी तपासणी मोहीम, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे मैदानात उतरून काम, बाजार समितीकडून कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा, सरपंच व सदस्यांकडून माझे गाव माझी जबाबदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.