प्रवाशांअभावी बसच्या फेऱ्या निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:01+5:302021-07-14T04:24:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने लालपरी प्रवाशांसाठी सज्ज झाली आहे. परंतु, प्रवाशांनीच पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बसच्या ...

Half of the bus trips due to lack of passengers | प्रवाशांअभावी बसच्या फेऱ्या निम्म्यावर

प्रवाशांअभावी बसच्या फेऱ्या निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने लालपरी प्रवाशांसाठी सज्ज झाली आहे. परंतु, प्रवाशांनीच पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बसच्या फेऱ्या निम्म्यावर आल्या आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाला लाखोंचा फटका बसला आहे.

कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. प्रवासी वाहतुकीला लॉकडाऊनच्या काळात बंदी होती. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून बस जागेवरच उभ्या होत्या. दुसरी लाट ओसरल्यानंतर बस धावू लागली. ग्रामीण भागात बस पोहोचली. महामंडळानेही मागेल तिथे बस सुरू करण्याचे धोरण घेतले आहे. आरोग्याच्यादृष्टीने सवे काळजीही घेतली जात आहे. असे असले तरी बसला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. प्रवासी मिळविण्यासाठी एसटीला प्रथमच प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. प्रवाशांनी बसकडे पाठ फिरविली. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी बसने प्रवास करतात. यातून एसटीला मोठे उत्पन्न मिळते. परंतु, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाच्या भीतीने इतर प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. प्रवासी नसल्याने ५० टक्के फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. एसटीला लांब पल्ल्याच्या फेऱ्यांतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. नगर जिल्ह्यातील विविध आगारातून गुजरातसह अन्य राज्यात २२ फेऱ्या सुरू होत्या. परंतु, शासनाने परराज्यातील वाहतुकीवर बंदी घातल्याने परराज्यातील फेऱ्या बंद होत्या. परराज्यातील प्रवासाला परवानगी मिळाली आहे. परंतु, प्रवासी नाहीत. त्यामुळे पररराज्यातील फेऱ्याही बंद करण्यात आल्या असून, एसटीला मोठा तोटा झाला आहे.

....

जिल्ह्यातील एकूण आगार

११

.....

एकूण बसेस

५६५

..........

रोज एकूण फेऱ्या

९००

.....

पुन्हा तोटा वाढला

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बससेवा सुरू करण्यात आली. बसला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा तोटा वाढला आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे प्रवाशी संख्येत घट झाली असून, एसटीचा तोटा २५० कोटींच्या घरात पोहोचला आहे.

....

दुसऱ्या राज्यातील २२ फेऱ्या बंद

परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परराजात जाणाऱ्या बसला प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळेही परराज्यातील फेऱ्या बंद असून, यामुळे एसटी महिन्याला सुमारे ७१ लाखांचा तोटा झाला आहे.

.....

ग्रामीण मार्गावर प्रवासी मिळेना

शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे ग्रामीण मार्गावर प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मार्गावरील बससेवा बंद आहेत. ज्या बस सुरू आहेत, त्यांनाही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने तोटा सहन करून बससेवा सुरू आहे.

....

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक फेरी झाल्यानंतर बस निर्जंतुक करण्यात येते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही काटेकोर पालन केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांनी बसने प्रवास करावा. बसचा प्रवास आराेग्याच्यादृष्टीने सुरक्षित आहे.

- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर

..

सूचना : हा विषय डमीचा आहे.

Web Title: Half of the bus trips due to lack of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.