गुरुकृपेने भाविकांचा उध्दार
By Admin | Updated: April 22, 2016 00:10 IST2016-04-22T00:10:10+5:302016-04-22T00:10:42+5:30
भेंडा : गुरूवर निष्ठा ठेऊन एकलव्याने जादा ज्ञान मिळवले. कृष्णचरित्र गुरूशिवाय समजणे कठीण आहे. सांदीपनी ऋषी कृष्णाचे गुरू होते.

गुरुकृपेने भाविकांचा उध्दार
भेंडा : गुरूवर निष्ठा ठेऊन एकलव्याने जादा ज्ञान मिळवले. कृष्णचरित्र गुरूशिवाय समजणे कठीण आहे. सांदीपनी ऋषी कृष्णाचे गुरू होते. गुरूकृपेने उध्दार होतो, असा उपदेश केशव महाराज उखळीकर यांनी केला.
भेंडा (ता नेवासा) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त नागेबाबा परिवार व श्रीराम सेवा मंडळ आयोजित भागवत कथेत भागवताचार्य केशव महाराज उखळीकर बोलत होते.
ते म्हणाले, संताची सेवा देवाला आवडते. संत दुर्जनाला सज्जन बनवितात. देव दुर्जनाचा संहार करतात. देव पाहण्याची नाही तर अनुभवण्याची वस्तू आहे. रामचरित्रात शंका घेता येत नाही. कृष्णचरित्रात शंकेला वाव आहे. शक्ती व भक्तीचा देव बजरंग बली आहे. जीव अर्पण केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही.
भारत देश संस्कृती, ज्ञान, विरक्ती, पराक्रम, विद्या व स्वराज्याच्यादृष्टीने प्रगत होता. नालंदा विद्यापीठात १४ विद्या शिकवल्या जात होत्या. परदेशातील लोक विद्या घेण्यासाठी भारतात येत होते. परंतु भारतीय लोकांचेच देश, देव व धर्माबद्दल प्रेम संपल्याने आजची स्थिती निर्माण झाली. तुम्ही देश, धर्मासाठी काय केले याचा विचार करा. द्वारकेत राज्य स्थापनेनंतर कृष्णाने यज्ञ केला. सतराजीकाचा सेमंतक मणी चोरण्याचा आळ भगवंतावर आला. मण्याचा शोध घेतांना जांबुवंताशी युद्ध, जांबुवंती, सत्यभामेशी विवाह, जरासंध,शिशुपाल, दंतवक्र वध प्रसंगाचे वर्णन उखळीकर महाराजांनी केले. यावेळी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, बाळू महाराज कानडे, रामभाऊ गोल्हार, अण्णा भगत, सुदाम बनसोडे, बलभीम फुलारी, अशोक वायकर,कारभारी गायके, डॉ.कविता मुळे, उज्ज्वला भुसारी, राखी पोखर्णा, वर्षा शेलार, मीना मडके, कांता दुधाळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कथेचे पटांगण व इतर सफाईची जबाबदारी सचिन देशमुख, रमेश आरणे, तिरमल समाजातील सुभाष फुलमाळी, विलास फुलमाळी, तात्या फुलमाळी, अण्णा फुलमाळी यांनी चोख बजावली.
या भागवत कथेचा समारोप शुक्रवारी श्री हनुमान जयंतीच्या दिवशीे होणार आहे.
(वार्ताहर )