केडगाव : कोरोना विरोधातील लढाईमध्ये आता माजी सैनिक ‘कोरोना वॉरियर्स’च्या रुपात रस्त्यावर उतरले आहेत. ग्राम सुरक्षा समिती, गुंडेगाव आणि माजी सैनिक हातात हात घालून कोरोनाविरोधी मोहिमेत उतरले आहेत.
नगर तालुुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगावी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. माजी सैनिक संघटनाही यात मागे नाहीत. कोरोनाला पराभूत करण्यासाठी माजी सैनिकांच्या शिस्तीची साथ मिळाली आहे. साहजिकच त्यातून प्रशासनाला बळ मिळाले आहे. माजी सैनिकांचा चित्ता ड्रेस कोरोनाला अनुकुल वातावरण निर्मिती करणाऱ्या नागरिकांना शिस्तीचे धडे देणार आहे. सध्या कोरोनाविरोधी लढाईत सर्वसामान्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उतरले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवक, आरोग्य सेवक कार्यरत आहेत. पोलिसांचे देशातील योगदान पाहता, गुंडेगाव त्रिदल सेवा संघटना, गुंडेगाव आजी - माजी सैनिक संघटना ‘कोरोना वॉरियर्स’च्या रुपात उतरली आहे. या लढाईमध्ये गावातील रस्त्यावर माजी सैनिक दिसू लागले आहेत.
गावातील तपासणी नाका, नेमून दिलेल्या ठिकाणी नागरिकांना मदत करणे, आदी जबाबदारी माजी सैनिकांनी घेतली आहे. हे सर्व काम ते विनामोबदला पार पाडणार आहेत. शत्रूच्या विरोधातील लढाईनंतर आता देशाचे हे निवृत्त सैनिक निवृत्तीनंतरही कोरोना विषाणू महामारीत पुढे सरसावले आहेत. गुंडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील विविध ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली आहे.
सरपंच मंगल सकट व उपसरपंच संतोष भापकर यांनी या माजी सैनिकांना ग्राम सुरक्षा समितीत स्थान दिले असून, सुरक्षा समितीचे अधिकार दिले आहेत. या उपक्रमात माजी सैनिक मेजर शाम कासार, राहुल चौधरी, भवानी प्रसाद चुंबळकर, संतोष जाधव, मेजर संभाजी भापकर, विकास गव्हाणे, रामचंद्र हराळ, त्रिदल सेवा संघटनेचे पदाधिकारी यांनी भाग घेतला आहे.
.......
देशविरोधी शत्रूंना मात देणारे माजी सैनिक कोरोनाविरोधी लढाईतही निश्चित यशस्वी होतील.
- राजाराम भापकर गुरूजी, ज्येष्ठ समाजसेवक