धडधड वाढते ठोक्यात!
By Admin | Updated: June 26, 2023 13:21 IST2014-05-12T00:33:34+5:302023-06-26T13:21:37+5:30
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते यांची धडधड वाढली आहे.

धडधड वाढते ठोक्यात!
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते यांची धडधड वाढली आहे. कोण निवडून येणार? अशा पैजा लावणार्यांना ‘आता थोडी कळ काढा’, असा सल्ला मिळत आहे. त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. तब्बल एक महिन्यानंतर निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली होती. अखेर ती सोळा मेची तारीख चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदान झाल्यानंतर आठ दिवस कोण निवडून येणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेकांच्या पैजाही लागल्या होत्या,तर सट्टा बाजारातही मोठी उलाढाल झाली होती. तीच तीच चर्चा रंगत असल्याने कोण निवडून येणार याच्या चर्चाही थंडावल्या होत्या. उमेदवार, कार्यकर्ते आपापल्या कामात गुंतले होते. आता पुन्हा त्यांना निकालाची प्रतिक्षा लागली असून चार दिवसांवर निकाल येऊन ठेपल्याने निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. उमेदवारांची विश्रांती! उमेदवारांनीही मतदान ते निकाल या काळात सार्वजनिक कार्यक्रमांपेक्षा घरी विश्रांतीच घेणे पसंत केले. काही उमेदवार पर्यटनासाठी निघून गेले होते. मतदान झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी उमेदवार येत होते, मात्र त्यांना नागरिक भेटून कोण निवडून येणार?अशी थेट विचारणाही करीत होते. त्यामुळे सार्वजनिक कामांमध्ये न जाणेच उमेदवारांनी पसंत केले होते. आता हे उमेदवार थेट मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर प्रकटणार आहेत.