शैक्षणिक कार्यात मदत करून स्मृती जागविण्याचे कार्य महान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:51+5:302021-08-20T04:25:51+5:30
कोपरगाव : समाजात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असते. परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक ...

शैक्षणिक कार्यात मदत करून स्मृती जागविण्याचे कार्य महान
कोपरगाव : समाजात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असते. परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रसंगी त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून शिक्षणासाठी मदत करणे महत्वाचे असते. जेणे करून आपल्या हातून झालेल्या मदतीतून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनमान उंचावून त्यांच्या कुटुंबासह देशाचे भविष्य उज्ज्वल होते. याच भावनेतून वारीतील माझे तरुण सहकारी दिगवंत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांचे काम सुरू होते. मात्र, नियतीने अल्पावधीतच त्यांना आपल्यातून हिरावून नेले. परंतु, राहुलचा मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईक हाच वारसा पुढे नेऊन त्यांच्या स्मृती जागविण्याचे महान कार्य करीत असल्याचे कोपरगाव येथील गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी म्हटले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिगवंत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ राहुलदादा टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व मित्र परिवाराच्या वतीने बुधवारी ( दि. १८ ) वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २०२ व श्री. रामेश्वर विद्यालयातील ५५ गरजू विद्यार्थ्यांना उपस्थित उजळणी, परीक्षा पॅड, कंपासपेटी, वही, पेन आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती तथा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके होते.
यावेळी वारीचे सरपंच सतीश कानडे, सोमैया उद्योग समूहाचे उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, मुख्याध्यापक छबूराव पाळंदे, सेवा संस्थेचे माजी सदस्य मधुकर टेके, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोर्डे, विजय गायकवाड, सुवर्णा गजभिव, प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्र ललवाणी, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, मुख्याध्यापक सुकदेव कराळे, महिंद्रा ट्रॅक्टरचे व्यवस्थापक महेश जाधव, वारकरी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव बडाख, राजेंद्र टेके, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, पंडित वीर, मधुकर सोनवणे, अशोक निळे यांच्यासह सर्व शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कैलास शेळके यांनी केले. यावेळी बी. एम. पालवे, मछिंद्र टेके, लोकमतचे उपसंपादक रोहित टेके यांनी दिगवंत राहुल टेके यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा दिला. या उपक्रमासाठी पत्रकारसंघाचे कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, मोहन उकिरडे, प्रा. रवींद्र जाधव, नरेंद्र ललवाणी, चंद्रकांत पाटील, विजय गायकवाड, शिरीष सूर्यवंशी, कैलास शेळके, रवींद्र रासकर यांचे विशेष सहकार्य लाभले. राजू गावित यांनी आभार मानले.