युवकांमध्ये मोदी सरकारविरोधात मोठा असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:16+5:302021-07-12T04:14:16+5:30
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीविरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम ११ ते १५ जुलै दरम्यान हाती घेण्यात आली आहे. रविवारी ...

युवकांमध्ये मोदी सरकारविरोधात मोठा असंतोष
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीविरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम ११ ते १५ जुलै दरम्यान हाती घेण्यात आली आहे. रविवारी (दि. ११) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारविरोधात १ कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या मोहिमेत सही करत केंद्र सरकारविरोधात टीका केली. युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे, शेखर सोसे, सचिन खेमनर, भागवत कानवडे, रमेश गफले, विजय उदावंत, तानाजी शिरतार, सागर कानकाटे, सुमित पानसरे, ऋतिक राऊत, दीपक कदम, प्रथमेश मुळे, हैदरअली सय्यद, मनीष राक्षे, अमित गुंजाळ, मनीष कागडे, तात्या कुटे, तुषार वनवे आदी यावेळी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, मोदी सरकार हुकूमशाही आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस याचा सर्वसामान्यांची संबंध आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून ३५ ते ४० टक्के लूट केंद्र सरकार करत आहे आणि याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्राने ३५ ते ४० टक्के कर घेण्याऐवजी १८ टक्के जीएसटी लागू करावा. त्यातून नऊ टक्के राज्याला द्यावा व नऊ टक्के केंद्र सरकारकडे ठेवावा. हे सरळ धोरण असताना केंद्र सरकार आडमुठेपणाचे धोरण स्वीकारत आहे.
--------------------
केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपाची मंडळी सातत्याने किरकोळ दरवाढीविरोधात आंदोलन करत होती. त्यावेळेस किमती अगदी मर्यादित होत्या. मात्र, आता कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी असतानासुद्धा मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरात भरमसाट वाढ केली आहे. त्यावेळी आंदोलन करणारे आता मूग गिळून का बसले आहेत?
-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री