घरकुलाच्या जागेसाठी मिळणार अनुदान

By Admin | Updated: January 12, 2016 23:33 IST2016-01-12T23:24:16+5:302016-01-12T23:33:50+5:30

अहमदनगर : इंदिरा आवास योजनेत आता लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतला

Grant for house rent | घरकुलाच्या जागेसाठी मिळणार अनुदान

घरकुलाच्या जागेसाठी मिळणार अनुदान

अहमदनगर : इंदिरा आवास योजनेत आता लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्या पाठोपाठ घरकुलासाठी जागा उपलब्ध नसणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या जागेसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेत घरकुलासाठी ७ हजार पात्र लाभार्थी असून त्यांना या अनुदानाचा लाभ देता येईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत गुंड आणि नवाल बोलत होते. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली असून त्याची माहिती दोघांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, नंदा वारे आदी उपस्थित होते. यंदा जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेसाठी ५ हजार ७०० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यात १ हजार ३०० ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असून उर्वरित सर्व अनुसूचित जाती-जमातीचे लाभार्थी आहेत.
२००२ च्या दारिद्य्ररेषेच्या यादीप्रमाणे १७ हजार घरकुलांचे लाभार्थी असून ते सर्व सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी आहेत. याच यादीनुसार घरकुलासाठी पात्र असणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती लाभार्थी ज्यांच्याकडे जागा नाही, अशा लाभार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. पूर्वी या लाभार्थ्यांना २० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून ५० हजार रुपये अनुदान करण्यात आले असल्याचे नवाल यांनी सांगितले. या अनुदानासाठी ७ हजार लाभार्थी पात्र असून त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Grant for house rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.