आजी-आजोबांचे संस्कारच कुटुंब संस्था जिवंत ठेवतील : डॉ़ भाऊसाहेब सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:12 IST2019-05-17T16:03:31+5:302019-05-17T16:12:17+5:30
अहमदनगर : भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान आहे़ या संस्थेच्या माध्यमातून एका सुसंस्कृत पिढीच निर्माण होत असते़ ...

आजी-आजोबांचे संस्कारच कुटुंब संस्था जिवंत ठेवतील : डॉ़ भाऊसाहेब सोनवणे
अहमदनगर : भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान आहे़ या संस्थेच्या माध्यमातून एका सुसंस्कृत पिढीच निर्माण होत असते़ काळाच्या ओघात मात्र एकत्र कुटुंब पद्धतीचे विभक्त कुटुंब पद्धतीत रुपांतर होऊन मानवी आयुष्यातील नैसर्गिक सुख संपत चालले आहे़ याचा संपूर्ण समाजावरच विपरित परिणाम होत आहे़ पूर्वीचे दिवस पुन्हा आणायचे असतील तर कुटुंबातील मुलांवर माता-पिता आणि आजी-आजोबांचे संस्कार व्हावेत, असे मत समाजशास्त्र व मानववंश शास्त्राचे अभ्यासक प्रा़डॉ़ भाऊसाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले़
जागतिक कुटुंब दिनानिमित्त मंगळवारी ‘लोकमत’च्यावतीने आयोजित संवादसत्रात सोनवणे बोलत होते़ सोनवणे म्हणाले, पारंपरिक कुटुंब संस्थेने आजपर्यंत वंश आणि संस्कृती टिकवून ठेवली आहे़ या कुटुंबात मुलांवर बालपणापासून चांगले संस्कार व्हायचे़ औद्योगिकीकरणामुळे प्रथम एकत्रित कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागला़ नोकरीनिमित्ताने स्थलांतर झाले़ यातूनच आपसातील नातेसंबंध आणि जिव्हाळ्याची जागा केवळ अर्थार्जनाने घेतली़
आज प्रत्येकाच्या जगण्याची लाईफस्टाईल बदलली आहे़ आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण तरुणी लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत तर ज्यांनी लग्न केले त्यांना पुत्र प्राप्ती नको आहे़ पैसे असूनही माता-पित्यांना वृद्धाश्रमात ठेवले जात आहे, नवदाम्पत्यांमध्ये वादविवाद वाढले आहेत, आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ न दिल्याने ते वाईट मार्गाला लागले आहेत़ यातून गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे़ असे एक ना अनेक दुष्परिणाम विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समोर आले आहेत. सोनवणे पुढे म्हणाले औद्योगिकीकरण आणि डिजिटल युगातही कुटुंबातील जिव्हाळा पुन्हा निर्माण करणे शक्य आहे़
माता-पित्यांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, नवविवाहितांनी नैतिकता, अनैतिकता याचा विचार करून माता-पित्यांचा सन्मान करावा, घरातील ज्येष्ठांचा आदर करावा असे आवाहन त्यांनी केले़
तर समाजात वृद्धाश्रम राहणार नाही
वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही चांगली बाब नाही़ कमवित्या मुलांनी आपली जबाबदारी ओळखून माता-पित्यांचा संभाळ करावा़ सुनेने सासूकडे आई म्हणून पहावे़ धावपळीतही आपले संस्कार आणि कुटुंब जपणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सोनवणे म्हणाले़
शिक्षणातून संस्कार शिकवावा
घर आणि शाळा, महाविद्यालये ही मुलांवर संस्कार करण्याची मुख्य ठिकाणे आहेत़ आजच्या शिक्षण पद्धतीत संस्काराचा पाठ कुठेच दिसत नाही़ येणाऱ्या काळात तरी शिक्षणातून मुलांवर चांगले संस्कार होऊन ते एक आदर्श नागरिक घडतील अशी शिक्षणपद्धती निर्माण करावी असे मत सोनवणे यांनी व्यक्त केले़
(‘लोकमत अहमदनगर’ या फेसबुक पेजवर ही मुलाखत पाहता येईल.)