आजी-माजी नगरसेवकांना अटक
By Admin | Updated: July 11, 2024 18:06 IST2014-05-19T23:43:41+5:302024-07-11T18:06:20+5:30
अहमदनगर : माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या कार्यालयात काम करणार्या सोनू उर्फ इंद्रभान बाबुराव बोरुडे याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी

आजी-माजी नगरसेवकांना अटक
अहमदनगर : माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या कार्यालयात काम करणार्या सोनू उर्फ इंद्रभान बाबुराव बोरुडे याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक श्रीपाद छिंदम आणि माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारीच त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिल्लीगेट भागातील छिंदम यांच्या घरासमोरून (संतोषी माता पटांगण, दिल्लीगेट)धनंजय जाधव यांच्या कार्यालयातील सोनू उर्फ इंद्रभान बोरुडे हे जात होते. ‘तु आमच्याकडे का पाहतोस’? या कारणावरून श्रीपाद आणि श्रीकांत शंकर छिंदम यांनी सोनूला बेदम मारहाण केली. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे सोनू याचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छिंदम यांनी सोनू याला मारहाण केल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. संतोषी माता कॉलनीतील हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट व स्टिल आदी बांधकामाचे साहित्य चोरी करण्याचा सोनुने प्रयत्न केल्याची फिर्याद श्रीपाद छिंदम यांनी तोफखाना पोलिसांकडे दिली. आपल्या कार्यकर्त्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली जात असल्याचे समजताच माजी नगरसेवक धनंजय जाधव हे कार्यकर्त्यांसह तोफखाना पोलीस ठाण्यात पोहोचले. छिंदम आणि जाधव यांच्यात तोफखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे यांनी कार्यकर्त्यांना हुसकावले. त्यांनी आजी-माजी नगरसेवकांना चांगलेच खडसावले. त्यामुळे कार्यकर्ते पळून गेले आणि तणाव निवळला. या प्रकरणी श्रीपाद छिंदम यांनी सोनू विरुद्ध बांधकाम साहित्याची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, तर सोनू याने छिंदम बंधुनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. सोनू हा मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी श्रीपाद व श्रीकांत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नीता उबाळे करीत आहेत.