विविध मुद्यांवरुन ग्रामसभेत खडाजंगी

By Admin | Updated: June 22, 2014 00:22 IST2014-06-21T23:50:12+5:302014-06-22T00:22:40+5:30

जामखेड : जामखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करावे, या मागणीसाठी शनिवारी आयोजित ग्रामसभा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये निरनिराळ्या मुद्यांवर खडाजंगी झाल्याने वादळी ठरली.

Gramsabha on different issues | विविध मुद्यांवरुन ग्रामसभेत खडाजंगी

विविध मुद्यांवरुन ग्रामसभेत खडाजंगी

जामखेड : जामखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करावे, या मागणीसाठी शनिवारी आयोजित ग्रामसभा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये निरनिराळ्या मुद्यांवर खडाजंगी झाल्याने वादळी ठरली.
ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करावा, या जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक मुद्यांवर वादळी ठरली.
सभेत जामखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करावे, असा ठराव एकमताने करण्यात आला. जामखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात वाड्यांचा नगरपरिषदेत समावेश करावा यासाठी ग्रामस्थ आग्रही असताना सरपंच प्रा. कैलास माने यांनी विरोध करीत वाड्या-वस्त्यानिहाय गावकऱ्यांची मते जाणून घेतल्याशिवाय समावेशाबाबत निर्णय घेतला जाणार नाही,असे स्पष्ट केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामपंचायत पदाधिकारी नगरपरिषदेसाठी अनुकूल आहेत. मात्र ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होऊन द्यावा, असे सरपंच म्हणताच ग्रामस्थ आक्रमक झाले. जामखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर करण्याबाबतचा ठराव चर्चेला आणला असता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, नितीन हुलगुडे, मयुर डोके, सतीश राजगुरु, पोपट घायतडक, पवन राळेभात, नय्युम शेख, दिगंबर चव्हाण या कार्यकर्त्यांनी जामखेडच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करताना ग्रामपंचायत नागरिक सुविधा देण्यात कमी पडत आहेत. यामुळे नगरपरिषद होणे आवश्यक आहे. तसेच जामखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात वाड्यांचा नगरपरिषदेत समावेश करावा,अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, या मागणीला विरोध दर्शवित सरपंच माने म्हणाले, या वाड्यांचा समावेश केला जावा यासाठी प्रत्येक ‘वाडी’ तील लोकांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असे सांगताच ग्रामसभेत गोंधळ उडाला. यावेळी नागरिक म्हणाले, यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या अंमलबजावणी संदर्भात वाड्यांमधील नागरिकांचे ठराव घेतले की नाही, आताच का घेण्यात येणार आहेत याचे उत्तर ग्रामविकास अधिकारी यांनी द्यावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. यावर ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी सदर सात वाड्यांचा समावेश नगरपरिषदेत करण्यात येईल, असे सांगताच आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. (तालुुका प्रतिनिधी)
नागरिक अंधारात
महत्वाच्या विषयावर ग्रामसभा असतानाही नागरिकांना कळविण्यात आले नव्हते किंवा दवंडीही देण्यात आली नाही. नगरपरिषदेसाठी आग्रही असलेलेच सभास्थानी असल्याचे दिसून आले.
- राजू गोरे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
तर पुन्हा सभा घेऊ
ग्रामसभेची नोटीस बोर्डवर लावली होती. याविषयी कोणाला शंका असल्यास पुन्हा ग्रामसभा घेऊ. याविषयीची जनजागृती आठवडाभर करु. परिसरातील सात वाड्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी ग्रामसभा घेण्यात येईल.
- कैलास माने, सरपंच

Web Title: Gramsabha on different issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.