पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामसभेत तीव्र पडसाद
By Admin | Updated: June 2, 2014 00:36 IST2014-06-02T00:18:27+5:302014-06-02T00:36:18+5:30
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील दरोडा प्रकरणातील हल्लेखोरांना न झालेली अटक व चोर्यांचे सत्र थांबविण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे तीव्र पडसाद रविवारी येथे आयोजित ग्रामसभेत उमटले.

पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामसभेत तीव्र पडसाद
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील दरोडा प्रकरणातील हल्लेखोरांना न झालेली अटक व चोर्यांचे सत्र थांबविण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे तीव्र पडसाद रविवारी येथे आयोजित ग्रामसभेत उमटले. यावेळी पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. दरोडा प्रकरणातील हल्लेखोरांना अटक न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी कर्जत पोलिसांनी चौदा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी केलेल्या या मुस्कटदाबीचे तीव्र पडसाद गावात उमटले. संतप्त ग्रामस्थ रविवारी सकाळी आठ वाजता जगदंबा मंदिरासमोर एकवटले. त्याचवेळी ध्वनीक्षेपकावरून तातडीची ग्रामसभा आयोजित करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले. सकाळी नऊ वाजता मंदिरासमोर कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांच्या उपस्थितीत ग्रामसभा भरविण्यात आली. दरोड्यातील आरोपी पकडण्याऐवजी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. सुरुवातीला माजी जि.प. सदस्य राजेंद्र गुंड यांनी कर्जत पोलिसांच्या कृत्याचा निषेध करणारा ठराव मांडला. सर्वानुमते हा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यामध्ये सुपेकर यांच्या हल्लेखोरांना शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास येत्या शनिवारी (७ जून) पुन्हा कुळधरण चौफुल्यावर रास्ता रोको आंदोलन व सोमवारी (९ जून) कर्जत पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचे सामूहिक उपोषण करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. बाळासाहेब पाटील यांनी कर्जत पोलिसांच्या तपास कामाबाबत नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला. (वार्ताहर) ‘लोकमत’चे अभिनंदन कुळधरण येथील दरोडा, चोर्या, रस्तालूट या घटनांची इत्यंभूत वृत्तमालिका छायाचित्रासह प्रसिद्ध करीत पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवणार्या ‘लोकमत’ च्या अभिनंदनाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला. बाळासाहेब हरिभाऊ सुपेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावास सर्वानुमते संमती देण्यात आली. गुन्हे दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यातील शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष अशोक जगताप, सेवा संस्थेचे संचालक मंगेश पाटील, उपसरपंच सतीश कळसकर, सुनील सुपेकर, मोहन सुपेकर, दत्ता कुलथे, कांतीलाल सुपेकर आदी आंदोलनकर्त्यांनी आपण जामीन घेणार नसल्याचे सभेत स्पष्ट केले. पोलिसांनी आम्हाला अटक करावी, मात्र पोलिसांनी आता गावाचे संरक्षण न केल्यास कायदा हातात घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. महिलाही एकवटल्या वस्तीवर राहणार्या सरपंच मीना गुंड यांच्या पतीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या अधिकच संतापल्या. नजीकच्या गुंड, वारे वस्ती शाळेच्या पडवीत सभा घेत महिलांनी पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी सविता सुपेकर, हेमलता जगताप, विमल गुंड, छाया आजबे, निर्मला आजबे व इतर मिळून चाळीस महिला उपस्थित होत्या.