फीट इंडियासाठी अतिरिक्त तासिकेबाबत शासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:11+5:302021-01-23T04:21:11+5:30
शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविणे, प्रात्यक्षिक घेणे, क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेणे, खेळाचा सराव घेणे तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेणे, गुणांकन ...

फीट इंडियासाठी अतिरिक्त तासिकेबाबत शासन सकारात्मक
शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविणे, प्रात्यक्षिक घेणे, क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेणे, खेळाचा सराव घेणे तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेणे, गुणांकन करणे, याकरिता उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी असलेल्या ४, ३ व २ तासिका कमी पडत असून, त्यामध्ये फीट इंडिया उपक्रमाची भर शालेय स्तरावर घालण्यात आल्याने फीट इंडिया उपक्रम यशस्वीतेसाठी वेळापत्रकात दोन वाढीव तासिका प्रचलित कार्यभाराव्यतिरिक्त देण्यात याव्यात म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानभवनात शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या (अमरावती) मागणीवरून बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत फीट इंडिया मुव्हमेंटची प्राप्त परिस्थितीत शालेय स्तरावर असलेली गरज व या उपक्रमासाठी शालेय स्तरावर उपलब्ध तासिकेव्यतिरिक्त जादा तासिकांची आवश्यकता असल्याची मागणी अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी केली. महाराष्ट्रात या उपक्रमांतर्गत सर्वात मोठा सहभाग हा शालेय विद्यार्थ्यांचा असून, या उपक्रमाची यशस्विता शिक्षकांवर व संबंधित यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे या उपक्रमांतर्गत वाढीव कार्यभारास तासिकेची गरज असल्याचे शिष्टमंडळाने मांडले. यासंदर्भात विभागीय बैठक घेऊन लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उच्च पदस्थ अधिकारी यांनी उपाध्यक्षांना दिले. यावेळी शिवदत्त ढवळे, राजेंद्र कोतकर, ज्ञानेश काळे, कला - क्रीडा - कार्यानुभव शिक्षक कृती समितीचे ज्ञानेश भोसले, राजू उलेमाले, नितीन चौधरी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.