अहमदनगर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार माजलेला असताना तेथील पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारला रस्ता सापडला नाही. यंत्रणेच्या आधी भाजपचे पदाधिकारी तिथे पोहोचले. मंत्रालय ते पंढरपूर या रस्त्यावर दिसलेले मुख्यमंत्र्यांचे ड्रायव्हिंग स्किल कोकणात पूरग्रस्तांच्या मदतीला जाताना बघायचे होते. मात्र पूरग्रस्तांना वाचविण्यात, मदत करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
येथील भाजपच्या कार्यालयात शनिवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री महाड तालुक्यातील तळिये गावात पोहोचल्याचे कळाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असे सांगत वाघ म्हणाल्या, आजकाल मुख्यमंत्री मंत्रालयात येतात, ही सुद्धा माध्यमांची बातमी बनते, याचे आश्चर्य आहे. कोणतेही संकट आले की केंद्र सरकारडे बोट दाखविले जाते. त्यात खासदार संजय राऊत आघाडीवर असतात. केवळ एकमेकांना सांभाळणे म्हणजे सरकार चालविणे नाही. लोकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा सरकार पाच वर्ष टिकेल की नाही, याचीच चिंता मंत्र्यांना आहे. त्यामुळेच आमचे सरकार पाच वर्ष टिकणार आहे, असे मंत्र्यांना वारंवार सांगावे लागत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळकुटे मंत्री आहेत. चिपळूण तालुक्यातील नागरिक संकटात असताना ते तेथून पळून आले. मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ सांभाळण्यात व्यस्त आहेत, अशीची टीका त्यांनी केली.
---------
शरद पवार गुरुस्थानी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मला गुरूस्थानी आहेत. गुरुपद हे अढळ पद असते. राष्ट्रवादीतून बाहेर पडतानाही त्यांच्याच पायावर डोके ठेवून बाहेर पडले. भाजपात असले तरीही गुरू-शिष्य हे नाते अबाधित आहे.
---------
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
नगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस तक्रार घेत नाहीत. तक्रार दिली तर त्यावर गुन्हा दाखल होत नाही. गुन्हा दाखल झाला तर कारवाई होत नाही. राज्यातही अशाच घटना वाढल्या आहेत. नगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मी संबंधित कुटुंबांशी चर्चा केली आहे. पोलीस अधीक्षकांशी भेटून याबाबत कारवाई करण्याची मागणी करणार आहे. राज्यात महिला पोलिसांवरच अत्याचाराची प्रकरणे घडली असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. महिला पोलिसांचेच रक्षण न करणारे पोलीस खाते जनतेने रक्षण काय करणार असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.