गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधानांना पाठविल्या गोवऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:43+5:302021-07-16T04:15:43+5:30
अहमदनगर : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी गॅस दरवाढीमुळे महिलांना चुलीवर ...

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधानांना पाठविल्या गोवऱ्या
अहमदनगर : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी गॅस दरवाढीमुळे महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांनी शेणाच्या गोवऱ्या कुरिअरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविल्या. तसेच प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख कधी जमा करणार? असा सवालही महिलांनी केला.
सध्या जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यात येत आहेत. सायकल मोर्चा, बैलगाडी मोर्चा, शेणाच्या गोवऱ्या पाठविणे, पायी चालणे, आदी माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध केला जात आहे. गॅस दरवाढ कमी करावी, अशी मागणी करण्यासाठी महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात गोवऱ्या घेऊन निषेध केला. तसेच याबाबत उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यासाठी हिंदी भाषेतून निवेदन दिले. यावेळी सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सुमन काळापहाड, शारदा वाघमारे, उषा भगत, माजी नगरसेविका जरीणा पठाण, हेमलता घाटगे, रजनी भोसले, गीता लक्ष्मण, रिजवाना पटेल, कविता लोडगे, मुक्ता डहाळे, आदी महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला.
पंतप्रधानांनी २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचीही निवेदनात आठवण करून दिली आहे. दरम्यान, गोवऱ्या घेऊन केलेल्या या आंदोलनाची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे.
---
फोटो- १५ नगर महिला काँग्रेस
गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी महिलांनी गोवऱ्या घेऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. या गोवऱ्या कुरिअरद्वारे पंतप्रधांनांना पाठविण्यात आल्या.