वाळकीच्या बाजाराला गतवैभव
By Admin | Updated: October 13, 2016 00:48 IST2016-10-13T00:21:54+5:302016-10-13T00:48:45+5:30
वाळकी : नगर तालुक्यातील वाळकी येथे बैल, संकरित व गावरान गायी व म्हशींचा बाजार १७ आॅक्टोबरपासून पूर्ववत भरणार आहे. व्यापारी, ग्रामस्थ, शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वाळकीच्या बाजाराला गतवैभव
वाळकी : नगर तालुक्यातील वाळकी येथे बैल, संकरित व गावरान गायी व म्हशींचा बाजार १७ आॅक्टोबरपासून पूर्ववत भरणार आहे. व्यापारी, ग्रामस्थ, शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वाळकीचा बैलबाजार राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजाराला दीडशे वर्षांची परंपरा आहे. बाजार गावालगत असलेल्या वालूंबा नदीच्या मोठ्या पात्रात दर सोमवारी भरत होता. महाराष्ट्रातील नव्हे, तर शेजारील राज्यांतील व्यापारी व शेतकरीही वाळकीच्या बाजारात जनावरांची खरेदी-विक्रीसाठी येत असत. दुष्काळीस्थितीमुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने बाजारात येणाऱ्या जनावरांच्या संख्येत घट झाली होती. त्यामुळे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पशुधन व चारा-पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जनावरांच्या बाजारास गतवैभव मिळवू देण्याचा निर्धार केला. वाळकी ग्रामपंचायत, व्यापारी, ग्रामस्थ यांच्यामार्फत बाजारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व्यापारी, शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी-विक्रीसाठी सोमवारपासून बाजारात आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीस सरपंच संग्राम गायकवाड, उपसरपंच देवराम कासार, बाजार समिती संचालक दिलीप भालसिंग, भाऊसाहेब बोठे, रंगनाथ निमसे, पंडित बोठे, प्रकाश बोठे, संभाजी कासार, विठ्ठल सुपेकर, महादेव कासार, महेमूद सय्यद, नामदेव बोठे, व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य हजर होते. (वार्ताहर)