गोदामात कीडतेय मका

By Admin | Updated: June 9, 2014 00:03 IST2014-06-08T23:47:39+5:302014-06-09T00:03:46+5:30

साहेबराव नरसाळे , अहमदनगर जिल्हाभरातील गोदामात साठवलेल्या मक्याची अद्याप विक्री करण्यात आलेली नाही़ साठवणुकीतील त्रुटीअभावी मक्याला कीड लागत आहे़

Godown kiddatey maaka | गोदामात कीडतेय मका

गोदामात कीडतेय मका

साहेबराव नरसाळे , अहमदनगर
जिल्हाभरातील गोदामात साठवलेल्या मक्याची अद्याप विक्री करण्यात आलेली नाही़ साठवणुकीतील त्रुटीअभावी मक्याला कीड लागत असून, मका पिकाचे आयुष्यही केवळ सहा महिन्याचे असल्याने बहुतांश मका खराब होण्याच्या मार्गावर आहे़
आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्हाभरात मका खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांकडील मका हमी भावाने खरेदी करण्यात आली़ खरेदी केलेली मका सहा महिन्यात विकणे आवश्यक आहे़ मात्र, मका खरेदी होऊन आठ महिने झाले असतानाही अद्याप मका विक्री करण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही़
नोव्हेंबर २०१३ पासून मका खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती़ त्यासाठी जिल्हाभरात १४ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते़ या खरेदी केंद्रात खरेदी केलेली मका तालुकास्तरावरच्या शासकीय गोदामात साठविण्यात आली़
सर्वाधिक म्हणजेच २७ हजार ६१४ क्विंटल मका वांबोरी (ता़ राहुरी) केंद्रावर खरेदी करण्यात आली़ तर पाथर्डी केंद्रावर छटाक मकाही खरेदी करण्यात आली़ तर नगर केंद्रावर ३८८० क्विंटल मका खरेदी करण्यात आली़ अकोले तालुक्यात जानेवारी २०१४ मध्ये मका खरेदी केंद्र काही दिवसांसाठीच सुरु करण्यात आले होते़ या केंद्रावर १२४६ क्विंटल मका खरेदी करण्यात आली़
कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, राहाता, जामखेड या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मका खरेदी करण्यात आली़
जिल्हाभरात १ लाख ५० हजार ८६६ क्विंटल मका खरेदी करण्यात आली़ ही मका तालुकास्तरावरील गोदामात साठविण्यात आली आहे़
गलथानपणामुळे मका विक्री नाही
मका पिकाचे सरासरी आयुष्य केवळ सहा महिन्याचे आहे़ त्यामुळे सहा महिन्याच्या आत मका विक्री करणे आवश्यक आहे़ मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गलथानपणामुळे अद्याप मका विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही़
धुरीकरण आणि औषधीकरण केल्यास मका सुमारे आठ ते दहा महिन्यापर्यंत टिकते़ मात्र, जिल्ह्यातील अनेक गोदामांमध्ये धुरीकरणच झाले नसल्याचे सांगण्यात येते़
भारतीय खाद्य निगमच्या व्यवस्थापकांनी १७ मे रोजी तपासणी केली असता मक्याला कीड लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे़ त्यावर धुरीकरण व औषधीकरण करण्याची मागणी करुनही व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही़ साठविलेल्या मक्याची तातडीने विल्हेवाट लावावी़
-अनिल घनवट, शेतकरी संघटना.
भारतीय खाद्य नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी नेले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतर विक्री प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल़
- सोपान कासार,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Godown kiddatey maaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.