रक्ताच्या नव्हे, तर मैत्रीच्या नात्याने गॉडफादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:52+5:302021-06-20T04:15:52+5:30
श्रीरामपूर : तरुण अभियंता मुलाचे कर्करोगामुळे निधन झाले. स्वतः मेंदूतील रक्तस्रावाच्या दुर्धर आजारातून बचावले. नियतीने वाट्याला दिलेले दुःख त्यांनी ...

रक्ताच्या नव्हे, तर मैत्रीच्या नात्याने गॉडफादर
श्रीरामपूर : तरुण अभियंता मुलाचे कर्करोगामुळे निधन झाले. स्वतः मेंदूतील रक्तस्रावाच्या दुर्धर आजारातून बचावले. नियतीने वाट्याला दिलेले दुःख त्यांनी अखेर बाजूला सारले. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याकरिता आरोग्य मित्र म्हणून आयुष्य जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.
श्रीरामपूर येथील आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांची ही जीवन कहाणी आहे. जगभरात रविवारी फादर्स डे साजरा होत असताना सुभाषराव यांचा संघर्ष यानिमित्ताने प्रासंगिक बनला आहे. सुभाषराव हे रक्ताच्या नात्याने नव्हे मैत्रीच्या नात्याने अनेकांचे गॉडफादर ठरले आहेत. त्यांनी आजवर सहाशे कर्करोगाच्या रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता स्वयंसेवी संस्थांची तीन कोटी रुपयांहून अधिक मदत मिळवून दिली आहे. हिंदुजा, टाटा या रुग्णालयांत नामांकित डॉक्टरांची अपॉइंटमेंट ते रुग्णांना मिळवून देतात. स्वखर्चाने घरचा जेवणाचा डबा घेऊन रेल्वे अथवा एसटी बसने मुंबईला रुग्णासमवेत प्रवास करतात. प्रसंगी रुग्णवाहिकेत जाण्याचे धाडस वयाच्या साठीत दाखवतात. अनेकदा रुग्णांसमवेत त्याच्या कुटुंबातील सदस्य जाणूनबुजून येत नाहीत. वृद्ध आईवडिलांना नोकरदार मुले-मुली वेळ देत नाहीत, अशा प्रसंगी गायकवाड एकटेच रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारतात.
----
या समर्पणामागील करुण कहाणी
सुभाषराव यांचा एकुलता एक मेकॅनिकल इंजिनिअर मुलगा सोमनाथ कर्करोगाने २०१२ मध्ये मृत्यू पावला. २००५ पासून सुभाषराव हे त्याच्यासाठी मुंबईत आर्थिक मदत मिळवण्याची लढाई लढले. त्यांच्या दोन मुलींपैकी एक वयाच्या दहाव्या वर्षी जग सोडून गेली. सुभाषराव यांना स्वतःला २०१० मध्ये मेंदूत रक्तस्राव झाला होता. कसेबसे ते त्यातून बचावले होते.
-----
जीवन संपवण्याचा निर्णय
पत्नी सुनंदा हिच्यासह जीवन संपवण्याचा निर्णय सुभाषरावांनी घेतला होता. मुलाच्या उपचारासाठी त्यांना निमगावखैरी येथील शेतीवाडी व सर्व काही विकावे लागले होते. जीवनात काहीच अर्थ उरलेला नव्हता. मात्र, नागेबाबा परिवाराचे कडूभाऊ काळे यांनी यापुढील संपूर्ण आयुष्य हे दुर्धर आजाराच्या लोकांना मदत मिळवून देण्यासाठी व्यतीत करण्याचा सल्ला दिला. तो सुभाषराव यांनी प्रत्यक्ष अमलात आणला.
----
सुनेला पुनर्विवाहाला केले प्रवृत्त
सोमनाथ याला कर्करोग आहे, हे माहिती असूनही त्याच्यावर एका मुलीने प्रेम केले. आंतरजातीय विवाह केला. या मुलीचा हा त्याग पाहून सुभाषराव यांनी नगर येथे खरेदी केलेला फ्लॅट सुनेच्या नावे केला. वडीलकीच्या भावनेतून तिला पुनर्विवाहाला राजी केले. येथेही ते खऱ्या अर्थाने गॉडफादर बनून पुढे आले.
-----
मी अद्यापपर्यंत संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करू शकलो नाही. एसटी बस किंवा रेल्वेचा मोफत प्रवास मिळू शकला तर कामाला आणखी गती मिळेल. कडूभाऊ काळे यांनी मला त्यांच्या पतसंस्थेत बसण्याची व्यवस्था केली. उपजीविकेसाठी मानधन सुरू केले.
- सुभाषराव गायकवाड, आरोग्यमित्र, श्रीरामपूर.