ध्येयापर्यंत सहज पोहोचता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:21+5:302021-09-24T04:24:21+5:30
संगमनेर : ध्येय प्राप्तीसाठी प्रबळ आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांची जोड असावी लागते. त्याला सकारात्मक विचार आणि सुसंगत लाभल्यास ...

ध्येयापर्यंत सहज पोहोचता येते
संगमनेर : ध्येय प्राप्तीसाठी प्रबळ आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांची जोड असावी लागते. त्याला सकारात्मक विचार आणि सुसंगत लाभल्यास ध्येयापर्यंत सहज पोहोचता येते, असे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी म्हणाले.
एम. एच. फाउंडेशन संचलित डॉ. आर. एस. गुंजाळ इन्स्टिट्यूटच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बुधवारी (दि. २३) ‘व्यक्तिमत्त्व आणि व्यावसायिक विकास’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गुंजाळ, प्रा. डॉ. रिया चोरडिया, प्रा. पी. के. पाटील उपस्थित होते.
मालपाणी म्हणाले, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपली देहबोली आणि वेशभूषा सौम्य असावी लागते. तसेच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या क्षमतेनुसार ध्येय निश्चित करावे. सकारात्मक विचार, सुयोग्य नियोजन आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. ‘समर्थ ध्येय, सौम्य देहबोली, सकारात्मक विचार, ऐकून घेण्याची क्षमता, आत्मविश्वास, लवचिकता आणि सुसंगत’ या सप्तसूत्रींच्या आधारे जीवनाच्या प्रत्येक आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जात यशाचे शिखर गाठता येते.
पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अभय चोरडिया यांनी करून दिला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी काशिनाथ गुंजाळ यांनी केले. प्रा. डॉ. चोरडिया यांनी आभार मानले.