फेसबुकवरील चुकीची मैत्री देतेय फसवणुकीस आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:12+5:302021-05-27T04:22:12+5:30
फेसबूकवर मैत्रीतून जवळीक निर्माण करायची. प्रेमाच्या गप्पा करून मोह-मायेचे जाळे निर्माण करायचे. या जाळ्यात गुरफटल्यानंतर अश्लील गप्पा अन् पुढे ...

फेसबुकवरील चुकीची मैत्री देतेय फसवणुकीस आमंत्रण
फेसबूकवर मैत्रीतून जवळीक निर्माण करायची. प्रेमाच्या गप्पा करून मोह-मायेचे जाळे निर्माण करायचे. या जाळ्यात गुरफटल्यानंतर अश्लील गप्पा अन् पुढे अश्लील व्हिडिओ क्लिप तयार करायची. ही क्लिप फेसबूकवर अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी करायची, असा फंडा वापरून फसवणूक केली जात आहे. अकोलेत या जाळ्यात पाच-सहा जण अडकले होते. त्यांना आर्थिक फटका बसलाच व काही काळ मानसिक स्वास्थ्य गमवावे लागले आहे.
तरुण व मध्यमवयीन नागरिकांना या मायेच्या जाळ्यात अडकविले जाते. काही शिकल्या सवरलेल्या व्यक्ती या मोहास बळी पडलेल्या दिसतात. भीतीपोटी काही पैसे देतात.
फसवणूक करणारे आपल्या संभाषणात फेरबदल करून व्हिडिओ क्लिप तयार करतात. बहुतेक क्लिप खोट्याच असतात. फेक फेसबूक अकाउंट बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. पैशांची मागणी होते. थोडेफार पैसे मिळाले तर ठीक नाही तर पुढे ही टोळी जाळ्यात अडकलेल्यांचा नाद सोडून देते; मात्र फेसबूकवरील अशी चुकीची मैत्री घातक ठरू शकते तेव्हा फेसबूकवर मैत्री जपून जोडा, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.
...................
सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये फेसबूकच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध तयार करून सुरुवातीस अश्लील चॅटिंग करून नंतर अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करण्याच्या मोठ्या घटना अकोलेत घडत आहेत. युवकांनो, सावधान! आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल तर घाबरु नका तर तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करा.
- महेश नवले, सामाजिक कार्यकर्ते.