शिक्षकांनाही कोरोना लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:09+5:302021-03-13T04:37:09+5:30
अहमदनगर : आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच फ्रंटलाईनर म्हणून शिक्षकही दररोज शाळेत जाऊन अध्यापनाचे काम करत आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांना ...

शिक्षकांनाही कोरोना लस द्या
अहमदनगर : आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच फ्रंटलाईनर म्हणून शिक्षकही दररोज शाळेत जाऊन अध्यापनाचे काम करत आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांना प्राधान्याने कोरोना लस द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभेत सदस्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा बुधवारी दुपारी उपाध्यक्ष तथा समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे आदींनी सहभाग घेतला. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, कोरोनाचे लसीकरणही जिल्ह्यात सुरू झाले आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल, तसेच इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकही प्रत्यक्ष शाळेत जाऊन अध्यापन करत आहेत. त्यामुळे शिक्षकांनीही कोरोना लसीकरण महत्त्वाचे असून तातडीने प्रशासनाशी चर्चा करून सर्व शिक्षकांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाशी चर्चा करण्याचे ठरले. याशिवाय सध्या शिक्षकांकडून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू असून ते शिक्षकांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन बिनचूक करावे व त्याचा अहवाल तातडीने सादर करावा. सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या शैक्षणिक वाढ व दर्जात्मक वाढीबाबत बैठकांचे आयोजन करावे, शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून फेरसर्वेक्षण करावे, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव घ्यावा, अशा अनेक सूचना सभेत देण्यात आल्या.
----------
... तर तीन दिवस शाळा बंद
ज्या शाळेत विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह येतील तेथील शाळा तीन दिवस बंद ठेवून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करावा. शिक्षकांनी याबाबत गृहभेटी देऊन इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे, असा निर्णयही सभेत झाला.