घोडेगाव कालवा अस्तरीकरणातून होईल पाचशे हेक्टर क्षेत्राला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:20+5:302021-02-05T06:41:20+5:30

जामखेड : तालुक्यातील घोडेगाव तलावाच्या कालव्याचे अस्तरीकरण केल्यास नव्याने पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन वाघा, महारूळी व गुरेवाडी या ...

Ghodegaon canal lining will benefit an area of five hundred hectares | घोडेगाव कालवा अस्तरीकरणातून होईल पाचशे हेक्टर क्षेत्राला फायदा

घोडेगाव कालवा अस्तरीकरणातून होईल पाचशे हेक्टर क्षेत्राला फायदा

जामखेड : तालुक्यातील घोडेगाव तलावाच्या कालव्याचे अस्तरीकरण केल्यास नव्याने पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन वाघा, महारूळी व गुरेवाडी या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल. अस्तरीकरणासह तलावाचे ‘ओव्हरफ्लो’चे पाणी अडविण्यासाठी आणखी एक पाझर तलाव झाल्यास लाभक्षेत्राला लाभ होईल. जिरायत क्षेत्रालाही आठमाही पाणी मिळेल. यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजनाची आवश्यकता आहे.

तालुक्यातील घोडेगाव तलाव हा काहुरी नदीवर १९७३ साली बांधला आहे. तलाव मातीचा असून १०० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. तलावावर चार गावचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. घोडेगाव परिसरातील तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. एक कालवा आठ कि.मी. लांबीचा असून तो आजतागायत कच्चा असून खोदकाम करून केलेला आहे. या कालव्यातून रब्बीची दोन आवर्तन दिले जातात. त्याचा लाभ वाघा, महारूळी, गुरेवाडी या गावातील शेतीला होतो.

कालवा नादुरुस्त असल्यामुळे शेवटपर्यंत (टेल) पाणी जात नाही. कालवा सातत्याने फुटत असल्याने शेजारी असलेल्या शेतजमिनीत पाणी जाऊन मोठे नुकसान होते. यामुळे शेतकरी आवर्तन सोडण्यास विरोध करतात. त्यामुळे अधिकारीही आवर्तन सोडण्यास टाळाटाळ करतात. त्यातून इतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. या कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास आवर्तन वेळेवर सुटेल. याचा लाभ पाचशे हेक्टर क्षेत्राला होऊ शकतो. तसेच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वाहून जाणारे ओव्हरफ्लोचे पाणी तालुक्यातील विविध ठिकाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत. सध्या हे पाणी थेट मराठवाड्यात जाते. ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यातून सोडल्यास गुरेवाडी, महारूळी, पोतेवाडी, चोभेवाडी, उरे वस्ती येथील शेतीला पाणी मिळू शकते.

-----

घोडेगावचा कालवा ४० वर्षांपूर्वी तयार झाला आहे. तो मातीचा असल्याने अनेकदा फुटतो. त्याचा शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे कालव्याने अस्तरीकरण करावे. ओव्हरफ्लोचे पाणी अडविण्यासाठी नदीवर केटीवेअर बांधावेत, अशी मागणी इतर शेतकऱ्यांसह आमदार रोहित पवार यांच्याकडे करणार आहोत.

-प्रा. श्याम बारस्कर,

शेतकरी, घोडेगाव

----

रोहित पवारांनी दिला दिलासा...

आमदार रोहित पवार यांनी पावसाळ्यात ‘ओव्हरफ्लो’चे पाणी या गावांना मिळावे यासाठी १५ जेसीबी, पोकलॅनद्वारे १० कि.मी. पर्यंत कालवा खोदला व महारूळी तलावात पाणी सोडले. त्यामुळे या गावातील तलाव प्रथमच भरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जल्लोष केला. याचा फायदा शेतीला झाला. त्यांनी कालव्याचे अस्तरीकरण करून हा प्रश्न कायमचा सोडवावा, अशी मागणी होत आहे.

फोटो ३१ घोडेगाव, १,२

घोडेगाव तलावाचा मातीने बांधलेला कालवा.

Web Title: Ghodegaon canal lining will benefit an area of five hundred hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.