नगर तालुक्यात पुन्हा राजकीय एकीचा ‘घाट’
By Admin | Updated: August 17, 2014 23:31 IST2014-08-17T22:43:02+5:302014-08-17T23:31:40+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर तालुक्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आघाडी स्थापनेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे

नगर तालुक्यात पुन्हा राजकीय एकीचा ‘घाट’
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर तालुक्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची आघाडी स्थापनेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. यादृष्टीने प्राथमिक चर्चा झाली असून, दोन दिवसात सर्वांची एकत्र बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समजली. माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी या एकत्रित आघाडीचे सारथ्य करण्याचे मान्य केल्याने नगर तालुक्याचे तीन आमदार होण्याच्या दृष्टीने तालुक्यात पुन्हा एकीची ‘राजकीय साद’ घालण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत नगर तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व संपल्याने तालुका श्रीगोंदा, पारनेर, राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला होता. मागील लोकसभेच्या निवडणुकीत गेली १५ वर्षे राजकीय संघर्ष केलेले आ. शिवाजी कर्डिले व दादा पाटील शेळके हे आपले राजकीय विळ्या-भोपळ्याचे नाते तोडून ‘नगर तालुक्याची अस्मिता’ म्हणून एकत्र आले होते. मात्र त्यानंतर लगेच त्यांच्यात दुही निर्माण झाली. भाजपा प्रवेशामुळे कर्डिले यांची ‘राहुरी’ फत्ते झालीच, पण त्यांचे विरोधक असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे हे युतीच्या धर्माने एकत्र आले. गाडे-कर्डिले एकत्र आले. मात्र गाडे-शेळके व कर्डिले-शेळके यांच्यातील व त्यांच्या कार्यकर्त्यांमधील दुही वाढत गेली.
पारनेरचे आ. विजय औटी व श्रीगोंद्याचे आ. बबनराव पाचपुते यांच्या कार्यपद्धतीबद्दल नगर तालुक्यातून नाराजीचा सूर उमटू लागल्याने नगर तालुक्यात ‘राहुरी’च्या धर्तीवर श्रीगोंदा व पारनेरमध्येही आमदार निवडून आणून तालुक्याचे तीन आमदार करण्याबाबत तालुक्यातील काही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.
आ.कर्डिले यांनी मागील महिन्यात नगर तालुक्यात काढलेल्या आभार दौऱ्यात नगर तालुक्यातील नेत्यांनी एकजूट दाखवल्यास तीन आमदार होऊ शकतात, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यानंतर या विषयाला जाहीर तोंड फुटले. (प्रतिनिधी)