खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:49+5:302021-02-05T06:40:49+5:30
श्रीरामपूर : पालिकेच्या ४ फेब्रुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वीच नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहरातील नगररचना योजना दोन (अंतिम)मधील खेळाचे ...

खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठविण्याचा घाट
श्रीरामपूर : पालिकेच्या ४ फेब्रुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वीच नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहरातील नगररचना योजना दोन (अंतिम)मधील खेळाचे मैदान व शाळेच्या आरक्षित जागेचे आरक्षण उठविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका भारती कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांना पाठविण्यात आलेल्या पत्रिकेमध्ये ७६ क्रमांकाचा हा विषय आहे. त्यास कांबळे यांनी आक्षेप घेत पत्रक प्रसिद्ध केले आहे. गुरुवारच्या सभेमध्ये इतर नगरसेवकांना सोबत घेऊन हा विषय हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नगररचना योजना क्रमांक दोन (अंतिम) मधील एका जागेवर फेरबदल करण्यासाठी सभेची मान्यता घेतली जाणार आहे, मात्र तत्पूर्वी या विषयाला नगरसेविका कांबळे यांनी विरोध नोंदविला आहे. अद्याप पालिकेतील इतर नगरसेवकांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वादग्रस्त ठरावाचा विषय घेण्यात आला आहे. अंतिम मंजूर योजनेत फेरबदलाचा ठराव करण्याचा अधिकार पालिका सभागृहाला आहे का, असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला आहे. शहरात अनेक लोकांच्या जागा गेल्या ३५ वर्षांपासून आरक्षणामध्ये अडकलेल्या आहेत. असे असताना काही विशिष्ट लोकांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला. भविष्यात सरकारकडून ठराव मंजूर करणाऱ्या सर्व नगरसेवकांकडून वसुली काढून त्यांच्या संपत्तीवर बोजे टाकण्याची कारवाई केली जाऊ शकते. पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांचे बलाबल पाहता विषय मंजूर अथवा नामंजूर होण्याची शक्यता वर्तविणे कठीण आहे. मात्र शहरात मोजकेच खेळाचे मैदान उरलेले असताना हे मैदान गिळंकृत होऊ नये, असा आपला प्रयत्न असल्याचे कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
------------