केडगाव येथे शुक्रवारी आयोजित बीएसएनएल ऍम्प्लाॅईज युनियनच्या महाराष्ट्र परिमंडळाचे आठव्या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी नलावडे बोलत होते. या अधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरण व खाजगीकरणाला विरोध दर्शविण्यात आला. अधिवेशनसाठी परिमंडळ अध्यक्ष अप्पासाहेब गागरे, अखिल भारतीय सचिव जॉन वर्गीस, खजिनदार गणेश हिंगे, उपाध्यक्ष अमिताभ पाटील, संदीप गुळूजकर, सहसचिव विठ्ठल औटी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, देशात भांडवलदारी पोसली गेल्यास जनतेचे नुकसान व पिळवणूक होणार आहे. जनतेमधून उठाव करून शेतकरी आंदोलनाप्रमाणे कामगारांना मार्ग स्वीकारावा लागणार आहे. गेली सहा वर्षे ४-जी स्पेक्ट्रमकरिता बीएसएनएल कर्मचारी आंदोलन करीत आहेत. कंपनीच्या हिताकरिता १ लाख कर्मचाऱ्यांची जानेवारी २०२० रोजी सेवानिवृत्ती घेण्यात आली. केवळ बीएसएनएलचा वेतनावरील भार कमी व्हावा म्हणून कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी ऐच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारली. सरकारने प्रथम कंपनी तोट्यात कशी येईल यावर जास्त भर देऊन साधनसामग्री, ४-जी स्पेक्ट्रम इत्यादी सुविधा न दिल्यामुळे बीएसएनएल तोट्यात घालवली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात विठ्ठल औटी यांनी बीएसएनएल कशा पद्धतीने तोट्यात घालण्यात आली याचा आढावा घेऊन, कामगारांना भविष्यातील धोरणाबद्दल अवगत केले.
अध्यक्ष अप्पासाहेब गागरे म्हणाले, बीएसएनएल वाचविण्यासाठी बीएसएनएल ईयू या संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व युनियन व असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकारने भांडवलदारांचे हित जोपासल्याने सरकारी कंपनीचे दिवाळे काढले. या अधिवेशनासाठी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, गोवा, मराठवाडा विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोवा जिल्हा सचिव अमिता नाईक यांनी केले. आभार जिल्हा सचिव विजय शिपणकर यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष नवनाथ थोरात, रमेश शिंदे, वजीर शेख, संतोष शिंदे, शीला झेंडे परिश्रम घेत आहेत.
...............
फोटो ०३ अधिवेशन
ओळी-
बीएसएनएल ऍम्प्लाॅईज युनियनच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचा ध्वज फडकावून करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी.