निराधार वृद्धांना दररोज घास भरवणारी घारगावची लेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:42+5:302021-03-15T04:19:42+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता रामभाऊ खामकर यांनी गेल्या वर्षभरापासून १९ निराधार, गोरगरीब वृद्धांच्या दोनवेळच्या जेवणाची ...

निराधार वृद्धांना दररोज घास भरवणारी घारगावची लेक
श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता रामभाऊ खामकर यांनी गेल्या वर्षभरापासून १९ निराधार, गोरगरीब वृद्धांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय केली आहे. वैद्यकीय तपासणी करून त्यांना पडत्या काळात मदतीचा हात दिला आहे.
संगीता खामकर यांना प्रांजली व स्वरांजली या दोन मुली आहेत. प्रांजली ही पोलीस काॅन्स्टेबल तर स्वरांजली सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. पती भाऊसाहेब खामकर हे ग्रामसेवक पदावरून एक वर्षापूर्वी निवृत्त झाले. संगीता खामकर या घारगाव येथे दारूबंदी चळवळ, युवक-युवतींना वाहन परवाने मिळवून देणे, सामुदायिक विवाह, कुस्ती स्पर्धा असे विविध उपक्रम राबवत आहेत. महिला संघटनेच्या माध्यमातून त्या महिलांचे प्रश्नही सोडवत आहेत.
लाॅकडाऊन काळात त्यांनी सर्वसामान्यांची होणारी उपासमार पाहिली. त्यावेळी खामकर यांनी पतीच्या निवृत्ती वेतनातून घारगावमधील निराधार, सर्वसामान्य वृद्धांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला. दररोज १९ पुरुष व महिलांना त्या दोनवेळचा डबा देतात. यामध्ये १६ वृद्ध महिलांचा समावेश आहे. हे वृद्ध आजारी पडले तर त्यांना डॉ. सचिन, रिमा पानसरे, विशाल धनवडे यांच्या मदतीने वैद्यकीय सेवाही देतात.
---
लहानपणापासून समाजातील उपेक्षित घटकांविषयी आदर आहे. लाॅकडाऊन काळात काहींची उपासमार डोळ्यांनी पाहिली. वृद्ध हेच ईश्वर रूप मानून त्यांची सेवा करण्याच्या हेतूने त्यांना दोनवेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी पतीचीही साथ मिळाली आहे. वृद्धांची भूक भागविण्यात आत्मिक समाधान मिळते.
- संगीता खामकर,
सामाजिक कार्यकर्त्या, घारगाव
--
आमचे रक्ताचे नाते नसतानाही संगीता खामकर या वृद्धापकाळात आमची आधाराची काठी बनल्या आहेत. त्यांच्याकडून दररोज दोनवेळचे जेवण मिळते. यापेक्षा आमची कोणती अपेक्षा असणार, धन्यवाद या लेकीला.
- हरणाबाई धस
ज्येष्ठ महिला