अंगठा टेकवा, धान्य मिळवा
By Admin | Updated: July 1, 2017 18:51 IST2017-07-01T18:51:54+5:302017-07-01T18:51:54+5:30
तुम्हाला धान्य मिळविण्यासाठी अंगठा मारावाच लागणार आहे़

अंगठा टेकवा, धान्य मिळवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : तुम्हाला वाचता येतेय़़ चांगली सहीही करता येतेय़़़ तुम्ही अडाणी नाहीत़़ तरीही आता तुम्हाला धान्य मिळविण्यासाठी अंगठा मारावाच लागणार आहे़ हा अंगठा शाईत नव्हे तर पीओएस मशीनवर टेकवावा लागणार आहे़ तरच तुम्हाला तुमच्या हक्काचे रेशनचे धान्य मिळणार आहे़
जिल्हा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य वाटपासाठी आता बायोमेट्रिक प्रणाली लागू केली असून, जिल्ह्यात दोन हजार पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशिन दाखल झाले आहेत. आठवडाभरात दुकानदारांना प्रशिक्षण देऊन या मशिन स्वस्त धान्य दुकानांत कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी दिली.
स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी, तसेच सर्व यंत्रणेवर प्रशासनाचे नियंत्रण राहण्यासाठी ही प्रणाली संपूर्ण राज्यात यापूर्वीच कार्यान्वित झाली आहे. नाशिक विभागात हे काम रखडले होते. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाने दोन हजार मशिन जिल्ह्यासाठी मागवले आहेत. जिल्ह्यात एकूण १८३७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्या सर्व दुकानदारांना हे मशिन कसे वापरावे, याचे प्रशिक्षण पुरवठा विभाग व ओयासीस कंपनीच्या प्रतिनिधींकडून येत्या आठवडाभरात टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे.
आता स्वस्त धान्य मिळवण्यासाठी ग्राहकांना प्रथम त्यांचा अंगठा या मशिनवर टेकवून ओळख पटवावी लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला कोणते धान्य, किती व कोणत्या वेळेला दिले याची माहिती आॅनलाइन पुरवठा विभागाला समजेल. तसेच त्या धान्याचे बिल याच मशिनमधून बाहेर पडेल. ज्या ग्राहकांनी धान्य नेले नाही, त्यांचे धान्य आपोआप शिल्लक स्टॉकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धान्य दुकानदाराला शिल्लक धान्य वजा करूनच नवीन धान्य दिले जाईल. शिवाय पुरवठा विभागालाही सर्वच दुकानदारांवर कार्यालयात बसल्याजागी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
ही प्रणाली लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम पुरवठा विभागाने आधीच पूर्ण केले आहे. त्यात शिधापत्रिकांवर असलेली कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांच्या हाताचे ठसे, शिधापत्रिकेचा प्रकार, किती धान्य मिळते, या माहितीचा समावेश आहे.
तालुकानिहाय स्वस्त धान्य दुकानांची संख्या
तालुका एकूण दुकाने
- नगर १२४
- एफडीओ ९१
- पारनेर ११८
- श्रीगोंदा १२४
- कर्जत १३५
- जामखेड १०३
- पाथर्डी १५२
- शेवगाव १२४
- राहुरी १०८
- नेवासा १५१
- संगमनेर १६३
- अकोले १३९
- राहाता ८१
- कोपरगाव ११३
- श्रीरामपूर १११
----------------------
एकूण १८३७