कोरोनाचे सावट दूर कर..भयमुक्त जीवन जगू दे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:47+5:302021-09-21T04:22:47+5:30
अहमदनगर : कोरोनाचे सावट लवकर दूर कर..आम्हाला भयमुक्त जीवन जगू दे.. असे साकडं घालत रविवारी भाविकांनी मोठ्या उत्साहात लाडक्या ...

कोरोनाचे सावट दूर कर..भयमुक्त जीवन जगू दे..
अहमदनगर : कोरोनाचे सावट लवकर दूर कर..आम्हाला भयमुक्त जीवन जगू दे.. असे साकडं घालत रविवारी भाविकांनी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायांना निरोप दिला. ‘बाप्पा मोरया’चा जयघोष, गुलाल, फुलांची उधळण तर कुठे ढोल-ताशांचा गजर अशा मंगलमय वातावरणात शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या जलकुंडात तर काही भाविकांनी कोरोना प्रादुर्भावामुळे घरीच मूर्तींचे विसर्जन केले.
रविवारी सकाळपासूनच शहरात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांची विसर्जन साेहळ्याची लगबग सुरू होती. कोरोनामुळे मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमांना बंदी होती त्यामुळे भाविकांनी महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या जलकुंडांत मूर्तींचे विसर्जन केले. काही भाविकांनी पिंपळगाव माळवी, कापूरवाडी तसेच शहर परिसरातील तलाव आणि विहिरींमध्ये मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जन सोहळ्यादरम्यान गर्दी अथवा काही वाद होऊ नयेत यासाठी जलकुंड व इतर ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. नगर शहरात यंदा १२३ सार्वजनिक मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली होती. या मंडळांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ‘श्रीं’चे विसर्जन केले.
---------------------
डिजे, ढोल घेतले ताब्यात
कोरोनामुळे मिरवणूक अथवा डिजे, ढोल वाजविण्यास व गर्दी करण्यास बंदी होती. रविवारी शहरातील चितळे रोड, पाईपलाईन रोड, बागरोजा हडको परिसरात काही उत्साही गणेश भक्तांनी डिजे व ढोल-ताशा वाजवत बाप्पांसमोर ताल धरला होता. पोलिसांनी तत्काळ हे साहित्य जप्त करत त्यांना समज दिली. त्यामुळे अपवादवगळता शहरात शांततेत विसर्जन सोहळा पार पडला.
------------------------
विशाल गणपतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या मानाच्या गणपतीची परंंपरेप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व दीपाली भोसले या दाम्पत्यांच्या हस्ते रविवारी उत्थापनाची महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज आदी उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता कोरोना नियमांचे पालन करत शहरातील आगरकरमळा येथील विहिरीत उत्सवमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. गणेश उत्सवात बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.
-----------------------
विसर्जन ठिकाणी गर्दी
रविवारी सायंकाळी चार वाजल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने शहरात काही जलकुंडाभोवती गर्दी झाली होती. पिंंपळगाव माळवी येथील तलावात विसर्जनासाठी सायंकाळी भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नगर-वांबोरी रस्त्यावर काळी वेळ वाहतूककोंडी झाली होती.
-
फोटो