खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:31+5:302021-06-21T04:15:31+5:30
संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना नुकतेच मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागातील आठ संघटना एकत्रित आल्या असून ‘महाराष्ट्र ...

खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मिळावी
संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना नुकतेच मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागातील आठ संघटना एकत्रित आल्या असून ‘महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने लवकरच विद्यार्थ्यांच्या सर्व सुरक्षा उपायांसह मर्यादित विद्यार्थी संख्या घेऊन क्लासेस सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला. प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे जागेचे भाडे, घरभाडे थकले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधन देणे बाकी आहेत. दैनंदिन खर्च, वीज बिल, घरखर्च, कुटुंबांतील सदस्यांचे आजारपण यासाठी मोठा खर्च होतो. मात्र, क्लासेस सुरू नसल्याने क्लास संचालकांसमोर व त्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. घेतलेल्या कर्जाचे अनेकांचे हप्ते थकल्याने ते मानसिक तणावाखाली आहेत. शासनाकडून आतापर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. बऱ्याच क्लास संचालकांना भाडेतत्त्वावर घेतलेली जागा सोडण्याची वेळ आली असून काहींनी बेंचेस व इतर साहित्य विकून उदरनिर्वाह केला आहे.
‘महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समिती’च्या झालेल्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने मार्गदर्शक नियमांचे पालन करून क्लासेस सुरू करण्याची तयारी क्लास संचालकांनी सुरू केली आहे. विद्यार्थी येण्यास तयार असून क्लास सुरू करा, असे पालक आम्हाला सांगत आहेत. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने काही विषय ऑनलाईन तसेच काही विषय ऑफलाईन पद्धतीने कसे शिकविले जाऊ शकतील. याचाही विचार झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर खासगी कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी मिळावी. असेही तहसीलदार निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून त्यावर संगमनेरातील खासगी कोचिंग क्लासेस संचालकांच्या सह्या आहेत.