गॅस टाकीच्या स्फोटाने घराचे पत्रे उडाले
By Admin | Updated: October 3, 2016 00:22 IST2016-10-03T00:18:01+5:302016-10-03T00:22:09+5:30
बोधेगाव : बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यात वसंतराव सोनार यांच्या राहत्या घराच्या पत्र्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गॅस टाकीच्या स्फोटाने घराचे पत्रे उडाले
बोधेगाव : बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यात वसंतराव सोनार यांच्या राहत्या घराच्या पत्र्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. नशीब बलवत्तर असल्याने जीवितहानी टळली.
बालमटाकळी येथील सोनार गल्लीतील वसंतराव सोनार यांच्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्वयंपाक सुरु असतांना गॅसची गळती झाल्याने टाकीने अचानक पेट घेतला. कुटुंबातील व्यक्ती घाबरून घराबाहेर पळाल्यानंतर काही वेळातच गॅस टाकीने पेट घेऊन मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. स्फोटामुळे घराचे पत्रे तुटून बाजूला फेकले गेले. घरातील संसारोपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुमारे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच घराच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले. कुटुंबातील व्यक्ती जागे असल्यामुळे घराबाहेर पडल्याने जीवित हानी टळली. त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तलाठी के. बी. शिरोळे, बोधेगाव दूरक्षेत्राचे हेडकाँस्टेबल वामनराव खेडकर, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या वितरकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सोनार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
(वार्ताहर)