बागा जमीनदोस्त, घर जळाले

By Admin | Updated: June 5, 2014 00:07 IST2014-06-04T23:15:22+5:302014-06-05T00:07:27+5:30

संगमनेर : मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विविध गावांना बसला असून वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले.

Garden rocks, burned houses | बागा जमीनदोस्त, घर जळाले

बागा जमीनदोस्त, घर जळाले

संगमनेर : मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विविध गावांना बसला असून वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले. त्यामुळे अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला. रस्त्यावरील व शेत बांधावरील छोटे-मोठे वृक्ष, वीजवाहक सिमेंटचे खांब, पाचटाची व पत्र्याची घरे या वादळात अनेक ठिकाणी पडली. तळपेवाडी येथे घराची भिंत पडल्यामुळे काही जण किरकोळ जखमी झाल्याचे नायब तहसीलदार शितलकुमार सावळे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये वादळामुळे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करण्याचा सूचना तलाठी व कृषी सहाय्यकांना दिल्याचे प्रांताधिकारी संदीप निचित यांनी सांगितले. दरम्यान या वादळामुळे सर्वाधिक नुकसान महावितरणचे झाले आहे. मंगळापूर, चिखली, कासारा-दुमाला, राजापूर, धांदरफळ, निमज, साकूर, घारगाव व अन्य गावांमध्ये वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर पडले. ूमहावितरणने महत्त्वाच्या वीजवाहिन्या दुरूस्त केल्या असल्या तरी उपवाहिन्या दुरूस्त करण्यास उशीर लागणार आहे. (वार्ताहर) सात्रळ : राहुरी तालुक्यातील सात्रळ सोनगाव, धानोरे परिसरावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. वीज पडून एका शेतकर्‍याचे घर जळाले. राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोषीला मंगळवारी सायंकाळी गारपिटीचा मोठा तडाखा बसला. तुफानी वार्‍यासह जोरदार पाऊस व मोठ्या आकाराच्या गारांनी परिसराला जबरदस्त तडाखा दिला. गारांच्या तडाख्याने लोखंडी पत्रांना छिद्रे पडली. अनेकांची पत्रे उडाली. गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यातच मंगळवारी सात्रळ परिसराचा आठवडे बाजार असल्याने बाजाराची पुरत वाट लागली. गारांच्या तडाख्याने तंबू फाटले, भाजीपाल्याचे नुकसान झाले. परिसरातील शेतकर्‍यांचे शेती मालाचे प्रचंड नुकसान झाले. डॉ. पंजाबी यांचे साडेपाच एकर टरबुजाच्या शेतीचे नुकसान झाले. अ‍ॅड. विजयराव कडू यांच्या सहा एकर केशर जातीच्या आंब्याच्या बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पंचायत समिती सदस्य डुक्रे यांची डाळींब बागही उद्धवस्त झाली. विठ्ठल ताजणे या शेतकर्‍याच्या राहत्या घरावर वीज पडून संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने दहाच मिनिटे अगोदर संपूर्ण कुटुंब शेजारच्या वस्तीवर गेले होते म्हणून मोठा अनर्थ टळला. दिलीप कडू या शेतकर्‍याची गाय छप्पर पडून जखमी झाली. परिसरामध्ये विजेचे खांब वाकून संपूर्ण तारा तुटल्या. गेल्या वीस तासांपासून परिसरामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. उसाचीही मोठी हानी झाली आहे. कृषी व महसूल खात्याचे अधिकारी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामे करीत आहेत. (वार्ताहर) अकोले : तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळाने आढळा खोर्‍यातील डाळिंबाची झाडे मुळासकट उपटून पडल्याने डाळींब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून पीक नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे. गणोरे, विरगाव, देवठाण, कळस, सुगाव, तांभोळ, सांगवी, केळीरुम्हणवाडी परिसराला मंगळवारी वादळ वार्‍याचा तडाखा बसला. डाळिंब झाडांच्या ओळीच्या ओळी उन्मळून पडल्या आहे. विरगावफाटा येथे वीज पडून दोन बैल ठार झाले. सुगाव येथे प्रवासी जीपवर बाभळीचे झाड पडले. देवठाण येथील आश्रमशाळेचे पन्नास पञे उडून गेले. तांभोळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. धामणगाव पाट येथील सरस्वती विद्यालयाच्या तीन खोल्यांचे पञे उडून गेले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Garden rocks, burned houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.