प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:47+5:302021-07-27T04:22:47+5:30
नेवासा : नेवासा फाटा येथे मागील आठवड्यात एका प्रवाशाला जीवे ठार मारण्याची धमकी देत लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीस नेवासा पोलिसांनी ...

प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद
नेवासा : नेवासा फाटा येथे मागील आठवड्यात एका प्रवाशाला जीवे ठार मारण्याची धमकी देत लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीस नेवासा पोलिसांनी अटक केली.
१८ जुलैला रात्री आठच्या सुमारास सुधीर रमेश कुमावत हे नेवासा फाटा येथे श्रीरामपूरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्ती कारने तेथे आली. कुमावत यांना लिफ्ट दिली. कुमावत यांना त्यांनी श्रीरामपूरकडे घेऊन न जाता नेवासा फाटा येथून औरंगाबादच्या दिशेने नेले. त्यांनी कुमावत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील साडेपाच हजार रूपये, एक चांदीचे कडे, मोबाईलद्वारे ऑनलाईन आरोपी किशोर भास्कर लांडे याच्या अकाउंटवर २५ हजार रूपये ट्रान्सफर केले. कुमावत यांना कायगाव फाटा येथे सोडून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी किशोर भास्कर लांडे (रा. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला अटक केली. हा गुन्हा संशयित आरोपी संतोष अशोक इंगोले (रा. सरस्वती, ता. लोणार, जि. बुलडाणा) याने व त्याच्या साथीदाराने केल्याचे समजले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस नाईक महेश कचे, पोलीस नाईक भागवत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार व पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, गणेश इथापे यांना तत्काळ लोणार येथे पाठवून सदर संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देत हा गुन्हा गणेश रामदास भागडे, उमेश विष्णू शिंदे,गोविद संतोष लहाने व अविनाश प्रकाश शिंदे (सर्व रा. ता. लोणार जि. बुलढाणा) यांच्या सोबत मिळून केला होता, असे सांगितले. सर्व आरोपी व गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेण्यात आली आहे.