९ कोटींच्या वसुलीसाठी ‘गणेश’ची जमीन विक्रीला
By Admin | Updated: June 8, 2014 00:35 IST2014-06-07T23:44:03+5:302014-06-08T00:35:41+5:30
श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील बंद पडलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याचा भोंगा सुरू होत असतानाच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने

९ कोटींच्या वसुलीसाठी ‘गणेश’ची जमीन विक्रीला
श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील बंद पडलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याचा भोंगा सुरू होत असतानाच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या कारखान्याकडील पावणे नऊ कोटी रूपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कारखान्याची जमीन विक्रीला काढली आहे.
बँकेचे कारखान्याकडे ५ कोटी १७ लाख ६१ हजार २० रूपये कर्ज थकीत आहे. त्यावर २ कोटी ५९ लाख ८३ हजार २८२ रूपये ६७ पैसे व्याजासह ७ कोटी ७७ लाख ४४ हजार ३०२ रूपये ६७ पैसे व्याजासह एकूण थकबाकी झाली आहे. या कर्ज थकबाकी वसुलीसाठी बँकने ४ जून २०१३ रोजी कारखान्याची मिळकत जाहीर लिलावाने विक्रीस काढली होती. लिलावात कोणीही बोली बोलण्यास भाग घेतला नाही. त्यामुळे बँकेने नाशिक येथील विभागीय सहकार सहनिबंधकांकडे थकबाकी वसुलीसाठी कारखान्याच्या मिळकतीवर मालक म्हणून बँकेचे नाव लावण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे कारखान्याच्या मिळकतीवर मालक म्हणून अहमदनगर जिल्हा बँकेचे नाव लावण्याचे प्रमाणपत्र विभागीय सहनिबंधकांनी दिले. त्यानुसार कारखान्याच्या महसूल दप्तरी बँकेचे नाव लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
३१ मे २०१४ अखेर बँकेची कारखान्याकडे ८ कोटी ७४ लाख २४ हजार ७५६ रूपये एवढी थकबाकीची रक्कम थकली आहे.
बँकेचे राहाता तालुक्याचे विशेष वसुली व विक्री अधिकारी जे. पी. गडाख यांनी या लिलावाची नोटीस काढली आहे. या नोटिसीमुळे काही दिवसांपूर्वी कारखाना सुरू होण्याच्या आशा निर्माण झालेल्या कारखान्याच्या कामगार व सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे.