वांबोरी चारी टप्पा दोनचे भवितव्य मुंबईच्या बैठकीत ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:07+5:302021-03-10T04:21:07+5:30
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी पाइपलाइन योजनेच्या टप्पा दोनच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ...

वांबोरी चारी टप्पा दोनचे भवितव्य मुंबईच्या बैठकीत ठरणार
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी पाइपलाइन योजनेच्या टप्पा दोनच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामाचे टेंडर व निधीसाठी लवकरच कार्यकर्त्याची लवकरच मुंबईत बैठक आयोजित केली आहे. मुंबईच्या बैठकीवरच वांबोरी चारी टप्पा दोनचे भवितव्य ठरणार आहे.
गेल्या ५० वर्षांपासून पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला मुळा धरणातून पाणी मिळावे, म्हणून वांबोरी चारीसाठी या भागात अनेक आंदोलने करण्यात आली. वांबोरी चारीचे रूपांतर वांबोरी चारी पाइपलाइन योजनेत करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतून १०२ तलावात नियमित पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा या भागातील शेतकऱ्यांना झाला. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी व उणिवा राहिल्याने, या भागातील अनेक गावे वंचित राहिली. या वंचित गावासाठी वांबोरी चारी टप्पा दोनला प्रशासकीय मंजुरीही मिळाली. मात्र, शासनाकडे पुरेशा निधी उपलब्ध नसल्याने योजना अनेक वर्षे रखडली. या दुष्काळी भागातील लोकांची वाढती मागणी व गरज लक्षात घेऊन शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ राज्याचे जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांना भेटणार असल्याने या योजनेचे काम आता मार्गी लागणार आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
...
योजना सौरऊर्जेवर करावी
मागील योजनेतील त्रुटी लक्षात घेऊन ही योजना सौरऊर्जेवर करावी. या योजनेसाठी लोखंडी पाइप वापरून पाइपलाइन जमिनीवरून घेण्यात यावी. त्यामुळे वेळेवर दुरुस्ती व पाणी चोरी रोखणे शक्य होईल. अशा अनेक मागण्या वांबोरी चारी कृती समितीतील सदस्यांनी व शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
....
वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामास सुरुवात व्हावी, यासाठी या भागातील कार्यकर्त्यांची मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच बैठक आयोजित केली आहे.
- अरुण आठरे, अध्यक्ष, वांबोरी चारी कृती समिती.