देशाचे भविष्य अंगणवाडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 00:15 IST2016-03-22T23:50:08+5:302016-03-23T00:15:30+5:30
अहमदनगर : गाव, वाड्या- वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविका काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडत आहे.

देशाचे भविष्य अंगणवाडीत
अहमदनगर : गाव, वाड्या- वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविका काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडत आहे. देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
जिल्हा परिषद महिला-बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १४६ अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मदतनीस यांचा मंगळवारी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे होत्या. खा. सुळे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांना वाड्या- वस्त्यांवर जाऊन ग्राऊं ड पातळीवर काम कराव लागते. हे काम करत असताना त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे. त्यांना विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेसंदर्भात सुळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करता येते. ज्यांना राजकारणात चांगले काम करायचे आहे, त्यांनी जिल्हा परिषदेत काम करावे, असे त्यांनी सूचवले. महिलांना पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण मिळालेले आहे. यापेक्षा अधिक आरक्षणाची मागणी महिला करणार नाहीत. राजकारणात महिलांना आरक्षण मिळाल्याने मोठा बदल झाला नसला तरी त्या दिशेने सुरुवात झाली आहे. महिला आरक्षणामुळे सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली आहे.
विखे यांनी महिला स्वत: संघर्ष करत त्यांच्या अडचणींवर मात करतात. जिल्हा परिषदेच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली असल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला देशात दुसरा आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. आता जिल्हा परिषद राज्यात तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली.
प्रास्ताविक महिला बालकल्याणच्या सभापती नंदा वारे यांनी केले. यात महिला बालकल्याण विभागाने राबवलेल्या विविध योजना, कुपोषण मुक्तीसाठी झालेले प्रयत्न, अंगणवाडी इमारतींच्या सद्यस्थितीची माहिती दिली. अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी शरद पवार यांच्यामुळे महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर आणि सदस्य उपस्थित होते. आभार महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी मानले. सूत्रसंचालन वैशाली कुकडे यांनी केले. १४६ सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
(प्रतिनिधी)
अध्यक्षा गुंड यांनी आपल्या भाषणात आरक्षणामुळे त्यांच्या पतीराजांना व्यासपीठासमोर बसण्याची वेळ आली, असे भाष्य केले. खा. सुळे यांनी आपल्या भाषणात गुंड यांच्या वक्तव्याचा धागा पकडत महिलांनाच संवेदना अधिक असतात. यामुळेच आपल्या पतीला राजकारणात आपल्यामुळे समोर बसावे लागले, याचे दु:ख होते, असे सांगितले.