कोविडसाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:53+5:302021-04-07T04:21:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून ५ कोटी ३६ लाखांचा निधी दोन ...

कोविडसाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून ५ कोटी ३६ लाखांचा निधी दोन दिवसांत मिळेल. या निधीतून मागील काही देणी आहेत. ती द्यावी लागणार असून, निधी कमी पडल्यास १४ व्या वित्त आयोगाचा वापरला जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोराेनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना चाचणीसाठी पाठविणे, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नवीन कोविड केअर सेंटर सुरू करणे, नोकरभरती, कोरोना चाचणी, कंटेन्मेंट झोन, आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे ८ कोटी २५ लाखांची मागणी केली होती. त्यांपैकी ५ कोटी ३६ लाख रुपये जिल्हा प्रशासनाने मंजूर केले आहेत. परंतु, मागील लॉकडाऊनच्या काळातील काही थकबाकी आहे. ती जिल्हा प्रशासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर देण्यात येईल. मागील देणी देऊन जो काही निधी शिल्लक राहील, तो उपाययोजनांसाठी खर्च केला जाईल. महापालिकेने ५ कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. तसेच चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी नाशिक येथील प्रयोगशाळेशी करार केला आहे. याशिवाय इतरही खर्च आहे. त्यासाठी निधी कमी पडेल. परंतु, यावरही तोडगा काढण्यात आला आहे. शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाचे ७ कोटी महापालिकेच्या तिजोरीत पडून आहेत. या निधीतून आवश्यकतेनुसार खर्च केला जाईल. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधी कमी पडणार नसल्याचे सांगण्यात आले.
....
बुथ हॉस्पिटलला दोन कोटी मिळणार
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील पहिले कोविड केअर सेंटर बूथ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले. तेव्हापासून तेथील आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र काम करीत आहेत. गेल्या वर्षभरात या रुग्णालयास एकाही रुपयाची मदत दिली गेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसांत महापालिकेला निधी प्राप्त होईल. तो प्राप्त झाल्यानंतर बूथ हॉस्पिटलला दोन कोटी रुपये देणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
......
शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे जसा जसा निधी लागेल, त्याप्रमाणे तो उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा प्रशासनाकडून निधी मिळाला आहे. तो कमी पडला तर १४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरू; पण निधी कमी पडू देणार नाही.
- शंकर गोरे, आयुक्त
.....
कोविड सेंटरसाठी मिळेनात मोठ्या इमारती
महापालिकेने नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग, शासकीय तंत्रनिकेतन, डॉनबास्को, बूथ हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. नव्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी इमारतींचा शोध सुरू आहे. परंतु, मोठ्या इमारतींचा तुटवडा असल्याने अडचणी येत आहेत. इमारतीअभावी नवीन कोविड केअर सेंटर सुरू करता येईनात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
---
डमी- नेट फोटो
कुंडी
०४ फंड फॉर कोरोना सेंटर डमी
रुपी